विशेष प्रतिनिधी / मुंबई
महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेल्या यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला काल (मंगळवार) अटक करण्यात आली होती. तसेच त्याच्याविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आज पनवेल सेशन्स कोर्टाकडून त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनविण्यात आली आहे.
यशश्री शिंदेच्या हत्या प्रकरणाने राज्याला हादरवून ठेवले आहे. तसेच आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, यासाठी रविवारी उरणमध्ये नागरिकांनी आंदोलन केले होते. यशश्री एका खासगी कंपनीत कार्यरत होती. गुरुवारी सकाळी घरातून बाहेर पडताना आपण आपल्या मैत्रिणीच्या घरी चाललो आहोत, असे तिने तिच्या घरात सांगितले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ती घरी आलीच नाही, त्यामुळे तिच्या वडिलांनी पोलिसांत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांचा तपास सुरु झाला.
शुक्रवारी रात्री उशिरा उरणच्या कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर यशश्रीचा मृतदेह आढळून आला. अत्यंत निर्घृणपणे यशश्रीची हत्या करण्यात आली होती. तिच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा होत्या. या प्रकरणात दाऊद शेख याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे त्याला कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातून पोलिसांनी अटक केली आहे. मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे दाऊद शेखवर संशय व्यक्त केला होता.
पोलिसांनी दाऊद शेख याला काल (मंगळवार) अटक केली असून आज (बुधवार) पनवेल सेशन्स कोर्टात हजर केले असताना त्याला सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.