विशेष प्रतिनिधी / मुंबई
शिवसेना (उबाठा) गटाच्या मुंबईतील शाखाप्रमुखांची बैठक आज बुधवारी पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन,’ असे खुले आव्हान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
लोकसभेमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला चांगले यश मिळाले आहे. त्यानंतर आता त्यांच्याकडून विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी आज मुंबईतील शाखाप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संबोधित करत असताना उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.
लोकसभेत आपण जी कामगिरी केली, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाम फुटला, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी एकेरी भाषेत जोरदार टीका केली.
शिवसेनेला आणि ठाकरे कुटुंबांला अनेक प्रकारे त्रास दिला जातोय. मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी अनेक डाव रचले होते. मात्र हे सगळं सहन करून मी हिंमतीने उभा राहिलो. आता एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन,’ असं खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वीच सत्ताधारी तसेच विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील काही नेतेही ‘जय महाराष्ट्र’ करण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी नेत्यांना खडेबोल सुनावले. आता मशालीचा प्रचार घरोघरी करा, कारण या चोर कंपनीने आपल्या शिवसेनाप्रमुखांचा फोटो लावला. आणि बाळासाहेबांचं धनुष्यबाण चोरला.
काही जणांनी सांगितलं की, आम्हाल तर तुम्हालाच मत द्यायचं होतं. अमराठी लोकांनी हे सांगितलं. पण आम्ही चुकून धनुष्यबाणाला मत दिलं. थोडी गोंधळाची परिस्थिती आहे. एकतर मशालीला मान्यता द्यावी यासाठी आपण निवडणूक आयोगाला पत्र दिलं आहे. त्याच्याशी साम्य साधणारं चिन्ह मतपत्रिकेवर असू नये याबाबत देखील त्यांना सांगण्यात आलं आहे. बघू त्याचा पण निकाल येईल ६०-६५ वर्षांनी. तोपर्यंत घरोघरी मशाल पोचवा असं ते म्हणाले.