गुरुवार, ०१ ऑगस्ट
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार खासदार निलेश लंके यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांना आता विधानसभा निवडणूक लढविण्याचे वेध लागले आहे. यासाठी शेजारच्या संगमनेर अथवा राहुरीतून आपण इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीर केले. तर दुसरीकडे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उमेदवारीला भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांनी विरोध केला आहे.
शेजारच्या संगमनेर अथवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी बाबत समन्वय होणार नसेल आणि संधी मिळाली तर निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे सांगत श्रीरामपूर राखीव असल्याने व शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील हेच उमेदवार असल्याने आपल्यासमोर या दोन मतदारसंघांचा पर्याय असल्याचे डॉ. विखे यांनी म्हटले आहे.
शिर्डी मतदार संघातील परिस्थितीबद्दल बोलताना ते म्हणाले, शिर्डीतून विखे पाटील उमेदवार असतील. श्रीरामपूर, अकोले राखीव आहे. कोपरगावचे राजकारण खूप क्लिष्ट आहे त्यामुळे माझ्यासमोर संगमनेर आणि राहुरी हेच दोन पर्याय आहे. याही तालुक्यात अनेक जण इच्छुक असून त्यांच्यात एकमत झाले नाही तर आपण तयार आहोत. माझे काम फक्त अर्ज करण्याचे आहे पक्षाने आदेश दिला तर निर्णय घेण्यास तयार असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.
तेव्हा पक्षाने थांबवलं आता थांबणार नाही, शिर्डीतही बंडखोरीचे वारे वाहण्याची चिन्हे...
शिर्डी विधानसभा मतदारसंघात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात प्रचंड नाराजी असल्याने ते निवडून येणार नाही. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह असून जनतेच्या इच्छेला प्रतिसाद देत आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सुतोवाच भाजपाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केले आहे.
त्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडे आपण उमेदवारीची मागणी करणार आहोत. वर्षानुवर्ष तालुक्यातील सत्ता केंद्र एकाच कुटुंबात असल्याने जनतेत नाराजी आहे. शिर्डी मतदार संघात विरोधकांना खालच्या पातळीवर जाऊन त्रास दिला जातो. जो विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असतो त्याच्या विरोधात आपल्या बगलबच्चांना पत्रक काढायला लावली जातात. विरोधात उभा राहिलेला उमेदवार मॅनेज आहे, अशी चर्चा करून बदनामी केली जाते.
एका विधानसभा निवडणुकीत आपण कडवी झुंज देत ११ फेऱ्यांमध्ये त्यांच्या विरोधात १३ हजाराचे मताधिक्य घेत पुढे होतो. नंतरच्या निवडणुकीत मी पक्षशिस्त पाळली. आता मात्र थांबणार नाही असे पिपाडा यांनी म्हटले आहे. त्यामुळे विखे यांच्या उमेदवारीलाच शिर्डीतून डॉ. पिपाडा यांनी आव्हान दिले असल्याचे मानले जात आहे.