गुरुवार, ०१ ऑगस्ट | अनंत पांगारकर
गेल्या काही दिवसापासून संगमनेरमधील अवैध धंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसागणिक ही संख्या वाढत चालल्याने शहराच्या शांततेला लवकरच गालबोट लागण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. ज्यांनी या अवैध धंद्यांवर नियंत्रण आणायचे तेच अवैध धंद्यातील भागीदार बनल्याने संगमनेरमध्ये पोलिसांचा धाक संपल्याचे दिसत आहे.
बहुचर्चित शक्तिमान टॉवरसह संगमनेरच्या अनेक भागात मटका, गुटखा, जुगार, गांजा विक्री, बनावट दारू, लोटो, बिंगो, अवैध कॅफे हाऊस, भंगार दुकाने, गोवंश कत्तलखाने, दुचाकी चोऱ्या, मंगळसूत्र गंठण, दागिने, चोऱ्या, बेकायदा प्रवासी वाहतूक पोलिसांच्या वरदहस्ताने सुरूच आहे. त्यामुळे कोणी कितीही आवाज उठवा आमचे कोणीच काही करू शकत नाही, या अविर्भावात आता अवैध धंदे चालक-मालकांची दादागिरी वाढू लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र संवाद न्यूज शहरातील अवैध धंद्यांवर सातत्याने प्रकाश टाकत आहे. पोलीस नावाची यंत्रणा सुस्त असून त्यांना देखील याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. अर्थकारण हे यामागील प्रमुख कारण आहे. अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी उपोषणादरम्यान एलसीबी या एकाच शाखेचा कोट्यावधीचा गैरव्यवहार समोर आणला. संगमनेरमधील अवैध धंद्याची होणारी उलाढाल बघता यामागील या एकाच शाखेचा वाटा सर्वाधिक आहे.
त्यामुळे अवैध धंद्याला जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या अधिपत्याखाली असलेल्या एलसीबीची एनओसी (ना हरकत) मिळाली की पोलीस खात्यातील कोणतीही शाखा या धंद्यांवर कारवाई करत नसल्याचे दिसते. परिणामी एलसीबी बरोबरच पोलीस दलातील अनेक अधिकारी, कर्मचारी यातील छोटे-मोठे लाभार्थी असल्याच्या चर्चा सातत्याने होतात.
त्यामुळेच पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि शहर पोलीस ठाण्यापासून अवघ्या शंभर दीडशे मीटर अंतरामधील अवैध व्यवसायाकडे देखील सातत्याने कानाडोळा केला जातो. हे धंदे डीवायएसपी वाकचौरे आणि पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना माहित नाही हे म्हणणे धाडसाचे ठरेल. याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे अशा अवैध व्यवसायिकांच्या दुकानासमोर बहुधांश वेळा वाहतूक पोलीस देखील वाहतुकीचे नियमन करत असतात. दिसत असून देखील त्यांना यावर कारवाई करता येत नाही.
हप्त्याची तारीख चुकली की व्यावसायिकांच्या पंटरवर लुटुपूटीची कारवाई केली जाते. अशा कारवायांची पंटर लोकांना देखील सवय झाली आहे. अवैध व्यवसाय करणाऱ्या मूळ मालकांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण नगण्य आहे. कारवाईत ताब्यात घेऊन काही वेळातच आरोपींना सोडून दिले जात असल्याने अवैध धंदे करणारे कायद्याला घाबरत नाही. विशेष म्हणजे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांचे पुढे काय होते, हे देखील कधी समोर आले नाही.
नगर जिल्ह्यात अवैध धंदे बोकाळले असताना ते बंद करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण एलसीबीचा हप्तेखोरीचा पर्दाफाश करत एका खासदाराला उपोषणाला बसावे लागते, तरीदेखील जिल्ह्यातील अवैध धंदे सुरूच राहतात ते बंद होत नाहीत, यासारखे दुर्दैव जिल्ह्यात दुसरे तरी कोणते दिसत नाही. खासदारांच्या उपोषणाकडे देखील दुर्लक्ष करणारी पोलिस यंत्रणा किती निर्ढावलेली असेल याचा यातून अंदाज येतो. उपोषणानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध धंदे बंद करण्याचे फर्मान काढले असल्याचे माध्यमातून छापून आल्यानंतर देखील अवैध धंदे सुरूच असल्याने हे आदेश फक्त दाखविण्यापुरते आहेत की काय अशी शंका निर्माण झाली आहे.
पोलीस ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्यांच्या नावाखाली वावरणाऱ्या अवैध धंद्याशी संबंधित कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची गर्दी बघितली की पोलिसांच्या विश्वासात भयमुक्त जगण्याचा विश्वास असलेल्या सामान्य नागरिकांचाही पोलीस नावाच्या यंत्रणेवरील विश्वास उडायला सुरुवात होते. गेल्या काही महिन्यातील अवैध धंद्यांवरील लुटुपुटीच्या कारवायांचा विशेष पोलीस महानिरीक्षकांनी आलेख बघितला तरीदेखील येथील अवैध धंद्यांवर शिक्कामोर्तब होईल. (क्रमशः ३)