प्रवीण पुरो | मुंबई
लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती सरकारने कंबर कसली आहे. खास करून भाजपा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असून भाजपाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये २८८ विधानसभा जागांपैकी पक्षाला केवळ ५५ ते ६५ जागाच मिळू शकतात, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
भाजपाला लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर जागा कमी मिळाल्या होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीतही भाजपाला मोठा फटका बसण्याची घोषणा शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात अद्याप कुठलेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नसले तरी भाजपाच्या अंतर्गत सर्व्हेतून ही बाब स्पष्ट होत आहे. या सर्व्हेत आता असलेल्या १०५ जागा टिकणं अजिबात शक्य नसल्याचं अनुमान काढण्यात आलं आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, लोकसभेतील पराभवानंतर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने टीका करत असल्यामुळे भाजपा आगामी विधानसभा निवडणुकीआधीच चिंतीत दिसत आहे. भाजपाला यापूर्वी २०१४ मध्ये १२२, तर २०१९ मध्ये १०५ जागा मिळाल्या होत्या. मात्र आता भाजपाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये २८८ विधानसभा जागांपैकी पक्षाला केवळ ५५ ते ६५ जागाच मिळू शकतात, असे एकंदरीत दिसत आहे.
भाजपाने महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांना सामील करून घेतले. यानंतर भाजपाने अजित पवार यांनी महायुतीत सामील केले. मात्र अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे संघ आणि भाजपाचे असंख्य कार्यकर्ते नाराज झाले होते. याच पार्श्वभूमीवर आरएसएसचे आजीव सदस्य रतन शारदा यांनी संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’ या साप्ताहिकातील लेखातून भाजपा नेत्यांना लक्ष्य केले होते. भाजपाच्या पराभवाला त्यांचेच राजकारण कारणीभूत ठरले आहे, असे सांगताना रतन शारदा यांनी महाराष्ट्राचे उदाहरण दिले.
महाराष्ट्रात भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांचे बहुमत असलेले सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांना सोबत घेण्याची काय गरज होती, असा सवाल रतन शारदा यांनी केला होता. अशातच आता भाजपाने अंतर्गत केलेल्या सर्व्हेमुळे पक्षाची चिंता वाढली आहे. या सर्व्हेमध्ये भाजपाला असलेल्या जागांपैकी ५० टक्केही जागा मिळणे अवघड असल्याचं म्हटलं आहे. हा आकडा फारफार तर ६० जवळ जाईल. मात्र सत्तेसाठी आकडा गाठणे शक्य नाही असं हा सर्व्हे म्हणतो. पक्षाच्या या अंतर्गत सर्व्हेने भाजपची गाळण उडाली आहे.