विशेष प्रतिनिधी / उरण
राज्यभर चर्चेत असलेल्या उरणच्या यशश्री हत्याकांड प्रकरणात पोलिसांकडून दररोज नवनवी माहिती समोर येत असून या हत्याकांडात लव्ह ट्रायअँगल आहे की नाही, याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. उरणमधील पोलिसांनी हत्येच्या घटनेनंतर विविध बाजूंनी तपासाला सुरुवात केली.अनेक पथके नेमण्यात आली होती.
या तपासातून २९ जुलै रोजी आरोपीला बंगळुरुतून अटक करण्यात आली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून मुलीच्या अंगावर गोंदण्यात आलेल्या दोन टॅटूंवरुन लव्ह ट्रायअँगलचा शोध घेतला जात आहे. आता, टॅटू आर्टीस्ट पोलिसांच्या रडावर आहे.
दाऊद आणि यशश्री हे १० वी पर्यंत एकत्र शाळेत शिकले आहेत. दरम्यान, आरोपी दाऊदने तिचा विनयभंग केला होता, त्यामुळे मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन दाऊदवर पोक्सोअंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये त्याला अटकही झाली होती. मात्र, सुटकेनंतर तो पुन्हा जबरदस्तीने यशश्रीच्या मागे लागला होता. तो तिचा पाठलाग करत होता, तिने त्याच्यासोबत लग्न करुन बँगळुरूला यावे, असे त्याला वाटायचे. मात्र, मृत मुलीने त्याला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यातूनच आरोपीने मुलीचा निर्घून खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुलीने दाऊदच्या नावाने टॅटू केला होता, हे रेकॉर्डवर आलं आहे. यशश्रीच्या अंगावर दोन टॅटू होते, मग दोन्ही टॅटू दाऊद शेखच्या नावाचे होते की दुसरा टॅटू दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाचा होता, असा प्रश्न पोलिसांना विचारण्यात आला होता. त्यावर, लव्ह ट्रायअँगल आहे की नाही, याबाबत सध्या सांगता येणार नाही. पण, टॅटूचा विषय आहे तो रेकॉर्डवर आहे, एक टॅटू दाऊदच्या नावाचा होता असे पोलिसांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी याप्रकरणी दाऊदचा मित्र मोहसीन यालाही अटक केली आहे. मात्र, या प्रकरणात मोहसीनचा ट्रायअँगल आहे की नाही हे अद्याप तरी समोर आलं नाही. पण, दोघांमध्ये जेव्हा वाद व्हायचा, ते एकमेकांना फोनवर ब्लॉक करायचे. तेव्हा मोहसीनच्या माध्यमातून त्यांचा संवाद होत असायचा अशीही माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेतून दिली.
दरम्यान, यशश्रीच्या पोस्टमार्टममध्ये तिच्या अंगावर दोन टॅटू गोंदण्यात आल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात हा टॅटू गोंदण्यात आला होता. त्यामुळे, यशश्रीने स्वखुशीने टॅटू गोंदला होता की, दाऊदने जबरदस्तीने हा टॅटू गोंदायला भाग पाडले होते, शिवाय दुसरा टॅटू कोणाचा हाही पोलिसांकडून तपास केला जात आहे. हा टॅटू कोठे काढला, कोणी काढला आणि याबाबत पोलीस सखोल तपास करणार आहेत. त्यावरुन, टॅटू आर्टीस्ट पोलिसांच्या रडारवर आहे.