शुक्रवार, ०२ ऑगस्ट
तक्रार अर्जावरून बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करून तक्रारदाराला योग्य ती मदत करण्यासाठी तब्बल दोन लाख रुपयांची लाच मागणारा पोलीस हवालदार १ लाख ७० हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.
अमोल दशरथ जाधव असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव असून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दिघी पोलीस ठाण्यात त्याची नेमणूक आहे. जाधव याच्या विरोधात लाच मागणी आणि लाच स्वीकारल्याप्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी, लाच लुचपतकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराने चोविसावाडी, चऱ्होली येथे बिल्डरकडून फ्लॅट खरेदी केला होता. बिल्डरने तक्रारदाराच्या परवानगीशिवाय परस्पर या फ्लॅटची दुसऱ्या व्यक्तीस विक्री केली. त्यामुळे तक्रारदाराने बिल्डर विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी दिघी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिला होता. या अर्जावरून बिल्डर विरुद्ध कारवाई करण्यासाठी व योग्य ती मदत करण्यासाठी पोलीस हवालदार अमोल जाधव याने तक्रारदाराकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली होती.
त्यामुळे तक्रारदाराने यासंदर्भात पुणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीचे पडताळणी केली असता पोलीस हवालदार जाधव याने वरील काम करून देण्यासाठी दोन लाख रुपये लाचेची मागणी करत तडजोडीअंती काम करून देण्यासाठी १ लाख ७० हजार रुपये मागितले.
त्यामुळे लाच लुचपतच्या अधिकाऱ्यांनी लाचखोर जाधव याला पकडण्यासाठी बुधवारी दुपारी वडमुखवाडी (ता. हवेली) येथे आळंदी विश्रांतवाडी रस्त्यावर सापळा लावला. तेथे जाधव याला पैसे स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
जाधव याच्या वर्गात दिघे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करत आहे.