शुक्रवार, ०२ ऑगस्ट
संगमनेर नगर परिषदेच्या नाशिक-पुणे मार्गावरील आझाद सांस्कृतिक भवन व पै. नूरमहमद शेख शॉपिंग सेंटरची दुरवस्था झाली असून देशाचे पहिले शिक्षण मंत्री, स्वातंत्र्य सेनानी मौलाना अब्दुल कलाम आझाद व संगमनेर नगर परिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष पै. नूरमहमद शेख यांची अवहेलना होत असल्याची तक्रार करत मुख्याधिकाऱ्यांनी या प्रश्न तातडीने लक्ष घालण्याची मागणी ॲड. सैफुद्दीन शेख यांनी केली आहे.
ॲड. शेख यांनी यासंदर्भात मुख्याधिकारी राहुल वाघ यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संगमनेर नगर परिषदेने काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून हे सांस्कृतिक भवन व शॉपिंग सेंटर बांधले आहे. मात्र गेल्या एक-दोन वर्षांपासून या इमारतीची दुरवस्था झाली असून तेथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, पुरेसा विद्युत प्रवाह नसणे, पावसाळ्यात छत गळती, खराब झालेल्या फुटलेल्या फरश्या, पुसट झालेल्या भिंती, पिण्याच्या पाण्याचे नळ असलेला अपरिपूर्ण अस्वच्छ भाग, दुर्गंधी अशा अवस्थेत या इमारतीतील सांस्कृतिक भवनाचा वापर सध्या सुरू आहे.
या सांस्कृतिक भवनामध्ये लग्नसमारंभासह अन्य लहान मोठे कार्यक्रम होत असतात. यासाठी संगमनेर नगरपरिषद संबंधितांकडून भाडे देखील आकारत असते मात्र नगरपालिका या भाड्याच्या मोबदल्यापोटी संबंधितांना काय सुविधा उपलब्ध करून देते हे एक कोडेच आहे. गेल्या दोन वर्षांपासून सांस्कृतिक भवनाच्या पश्चिममुखी दर्शनी भागात भिंतीवर “संगमनेर नगरपरिषद संगमनेर भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद सांस्कृतिक भवन व पै. नूरमहम्मद शरफोद्दीन शेख शॉपिंग सेंटर” असे नाव नमूद केलेले असून त्यातील अनेक अक्षरे देखील मिटलेली, मोडलेली आहे.
यासंदर्भात शेख यांनी व्हाट्सअप व प्रत्यक्ष भेटीत चर्चा करून देखील अद्याप पावतो कोणतीही सुधारणा झाली नसल्याचे आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने या प्रश्नात लक्ष घालून दुरुस्ती करण्याची मागणी शेख यांनी केली आहे.