शुक्रवार, ०२ ऑगस्ट
पोलीस ठाण्यात असलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करून नील अहवाल पाठविण्यासाठी तसेच भविष्यात तक्रार झालेला त्रास न होण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकाने तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.
चेतन चंद्रकांत थोरबोले (वय ३६) या सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरुद्ध पुण्याच्या लोणीकंद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत प्रथम पाच लाख व तडजोडीनंतर एक लाख रुपये लाचेची मागणी केल्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक लाख सत्तर हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्याच्या पोलिस हवालदारावर कारवाई होत नाही तोच सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे प्रकरण समोर आले आहे. तब्बल लाखाच्या पटीत लाच मागणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना वरकमाईची चटक लागल्याचे यातून समोर आले आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल होता. या तक्रार अर्जाची चौकशी वाघोली पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांच्याकडे होती. थोरबोले यांनी तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या अर्जात चौकशी करून नील अहवाल पाठविण्यासाठी व तक्रारदाराला भविष्यात कोणताही त्रास होणार नाही यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने पुण्याच्या लाचलुचपत विभागाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.
विभागाच्या पडताळणीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरबोले तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांचे तसेच तडजोडीनंतर एक लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने थोरबोले याच्या विरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक माधुरी भोसले या प्रकरणी तपास करत आहे.