शनिवार, ०३ ऑगस्ट
संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील अत्याचार, धर्मांतर प्रकरणातील आरोपी युसुफ दादा चौघुले याच्या पोलीस कोठडीत शनिवारी न्यायालयाने तिसऱ्यांदा ५ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.
दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी शादाब रशीद तांबोळी याच्यासह कुणाल विठ्ठल शिरोळे व आयाज अजीम पठाण हे अद्यापही फरार आहेत.
फिर्यादी अल्पवयीन असताना देखील आरोपींनी तिला प्रेमाचे आमिष दाखवून तिच्यासोबत सलगी केली. तिला फसवून मंचर येथे नेत अटकेतील आरोपी युसुफ चौघुले याच्या कारमधून फिर्यादीला पाण्यात गुंगीकारक औषध देऊन अर्धवट बेशुद्ध झाली असताना लग्नासाठी मंचरवरून चाकण येथे नेले. त्यानंतर तेथून दुसऱ्या गाडीतून मुंबई येथे पाठवून दिले होते. मुंबईत तिच्यावर अत्याचार करण्यात आले. तसेच तिचे धर्मांतर देखील केल्याचे समोर आले.
अटकेतील आरोपी युसुफ चौघुले याला शनिवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर हजर केले असता सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी सरकार पक्षाच्यावतीने न्यायालयासमोर जोरदार युक्तीवाद केला.
आरोपीकडून चौकशी दरम्यान सहकार्य होत नसून आरोपीने वापरलेले वाहन ताब्यात घ्यावयाचे आहे, धर्मांतर करणाऱ्या धर्मगुरूचा शोध घ्यावयाचा आहे, यासाठी आरोपीच्या कोठडीत वाढ करून मिळण्याची मागणी केली. न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी सरकार पक्षाची मागणी मान्य करत आरोपीच्या कोठडीत ५ ऑगस्टपर्यंत वाढ केली.