रविवार, ०४ ऑगस्ट
राज्याच्या आजी-माजी महसूलमंत्र्यांमधील वाद सर्वश्रुत असताना गेल्या दोन दिवसात या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या टीकाटिप्पणीनंतर आता विखे यांच्यावर पलटवार करत आमदार रोहित पवार यांचा संदर्भ देत राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे.
अहमदनगरमध्ये तलाठी नियुक्तीपत्रे देताना मंत्री विखे यांनी तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शक असल्याचे म्हटले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि थोरात यांनी या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. भ्रष्टाचाराचे एक उदाहरण जरी मिळाले तरी मी राजकारणातून बाजूला होईल आणि तुम्ही सिद्ध करु शकला नाहीत तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हा, असे जाहीर आव्हान राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना दिले होते.
त्यानंतर आमदार थोरात यांनी आपल्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट करत महसूल मंत्री विखे यांना “तुमचे म्हणजे, ‘सौ चूहे खा के बिल्ली चली हज को…’ असे झाले आहे.” असं म्हणत पुन्हा एकदा आव्हान दिले आहे.
https://x.com/bb_thorat/status/1819992556546982323?s=19
बाळासाहेब थोरात एक्सवर नेमकं काय म्हणाले?
महसूलमंत्री @RVikhePatil तुम्ही राजकारणातून संन्यास घ्या, असे मी म्हणणार नाही.
मात्र सत्य लपवले तरी बदलणार नाही. तलाठी भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराचा गोपनीय अहवाल आपल्याच अखत्यारीत येणाऱ्या जिल्हाधिकारी महोदयांनी राज्याच्या अपर मुख्य सचिवांना याच वर्षी फेब्रुवारीत पाठविला आहे. आपण त्यावर काय कार्यवाही केली, हे सुद्धा जनतेला आणि विद्यार्थ्यांना सांगावे. या शिवाय तलाठी भरतीमध्ये झालेल्या गैरप्रकारांचे अजूनही ढीगभर प्रकरणे आहेत, जी समोर आणली तर तुमचा ‘पारदर्शक कारभार’ उघडा पडेल.
बाकी प्रश्न राहिला रेटकार्डचा, तर महसूल मधील अधिकाऱ्यांनी आपल्या दोघांचाही कार्यकाळ बघितला आहे, सत्य काय ते सगळ्यांना माहित आहे. तुमचे म्हणजे, ‘सौ चूहे खा के बिल्ली चली हज को…’ असे झाले आहे. असं म्हणत त्यांनी विखे पाटलांना टोला लगावला आहे. तसेच आ. रोहित पवार यांनी तुम्हाला अहवाल पाठवला आहे, पाहिजे असल्यास मी ही पाठवतो. असं देखील थोरात यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटल आहे.