शनिवार, दि. ३१ ऑगस्ट
संगमनेर – चुलत भावांमधील वादातील शेत जमीन नांगरल्याचा राग येऊन रात्रीच्या वेळी कुऱ्हाडीने वार करत तर अन्य आरोपींनी काठ्या, लाथाबुक्क्याने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने एका आरोपीला दोषी ठरवत पाच वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तर अन्य पाच आरोपींची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.
सुरेंद्र देवराम तांगडकर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून प्रवीण सुरेंद्र तांगडकर, कल्पना सुरेंद्र तांगडकर, संकेत मच्छिंद्र तांगडकर, दत्ता हौशीराम तांगडकर व मच्छिंद्र देवराम तांगडकर या अन्य आरोपींचा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या समावेश आहे.
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी शनिवारी या खटल्याचा निकाल जाहीर केला. संगमनेर तालुक्यातील तांगडी (आंबीखालसा) येथील या खटल्याकडे संगमनेर तालुक्याच्या पठार भागाचे लक्ष लागले होते. सरकार पक्षाच्यावतीने या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मच्छिंद्र गवते यांनी काम पाहिले. तर फिर्यादीच्यावतीने त्यांना ॲड. अश्विनी घुले व ॲड. प्रकाश काळे यांनी सहाय्य केले.
यासंदर्भात सागर पोपट तांगडकर यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार तांगडी (आंबीखालसा) येथील सुरेंद्र देवराम तांगडकर व त्यांचा भाऊ राजेंद्र देवराम तांगडकर यांच्यात जमिनीवरून वाद सुरू होते. त्यांच्यातील वादातील शेत जमीन पोपट नानाभाऊ तांगडकर यांनी १६ मे २०२० रोजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरून दिली होती. त्यानंतर ते घरी परतले होते. फिर्यादीच्या शेताची नांगरणी करण्यासाठी फिर्यादीने वडिल पोपट तांगडकर यांना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दऱ्यातील शेतात नेऊन सोडले होते.
त्यानंतर अर्ध्या पाऊण तासातच फिर्यादीला वडिलांचा फोन आला. त्यांना फोनवर बोलता येईना, तसेच त्यांना बीपी आणि डायबिटीसचा त्रास असल्याने काहीतरी झाले असे समजून फिर्यादी आपल्या चुलत भावांसमवेत मोटरसायकलवर दऱ्यातील शेतात जात असताना त्यांना वेगात येणाऱ्या मोटरसायकलवर गावातील काही लोक दिसले होते. फिर्यादी शेतात गेला असता त्याला वडील बेशुद्ध पडलेले व त्यांच्या डोक्यातून रक्त येत असलेले दिसून आले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
फिर्यादीकडील ट्रॅक्टर ड्रायव्हर शांताराम दुधवडे यांनी दिलेल्या माहितीनंतर सुरेंद्र देवराम तांगडकर, प्रवीण सुरेंद्र तांगडकर, कल्पना सुरेंद्र तांगडकर, संकेत मच्छिंद्र तांगडकर, दत्ता हौशीराम तांगडकर व मच्छिंद्र देवराम तांगडकर (सर्व रा. तांगडी, आंबीखालसा, संगमनेर) यांनी पोपट तांगडकर यांना जीव घेण्याच्या उद्देशाने केलेल्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाल्याची फिर्याद दिली होती. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांनी तपास करत न्यायालयात आरोपीं विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते.
जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज चालले. सुनावणी दरम्यान संगमनेर मधील डॉ. अमोल कर्पे, नाशिक येथील डॉ. अमित येवले यांच्यासह प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शांताराम दुधवडे, आणि जखमी पोपट तांगडकर यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. तर पैरवी अधिकारी प्रवीण डावरे यांच्यासह महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती नाईकवाडी, प्रतिभा थोरात, साबळे, राहणे यांनी त्यांना सहाय्य केले.
सरकार पक्षाचे वकील, फिर्यादीचे वकील आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश आरोपी सुरेंद्र देवराम तांगडकर याला दोषी ठरवत भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ नुसार ५ वर्ष कारावास, ५ हजार रुपये दंड, कलम ३२६ नुसार ३ वर्ष कारावास, तीन हजार रुपये दंड आणि कलम ३२४ नुसार २ वर्ष कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आरोपीला प्रत्येकी तीन महिने कारावास भोगावा लागेल.