रविवार, दि. ०१ सप्टेंबर
संगमनेर – फॅब्रिकेशन व्यवसायासाठी भागीदार म्हणून घेतलेल्या बाप-लेकाची न वटणाऱ्या धनादेशाच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संगमनेरच्या न्यायालयाने अमृतवाहिनी पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राध्यापकाला दोन गुन्ह्यात प्रत्येकी सहा महिने कारावास आणि दहा लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तर दोन खटल्यांचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. ईश्वर देविदास फापाळे (रा. घोडेकर मळा, संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपी प्राध्यापकाचे नाव आहे.
या संदर्भात सुरुवातीला मुरलीधर किसन काकडे यांनी संगमनेरच्या न्यायालयात सर्वज्ञ फॅब्रिकेशन व फर्निचर व्यावसायिक प्राध्यापक ईश्वर देविदास फापाळे यांच्या विरोधात प्रत्येकी दीड लाखाचे दोन आणि साडेतीन लाख रुपयांचे दोन धनादेश न वटल्याप्रकरणी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स १३८ प्रमाणे ॲड. राजेश भुतडा यांच्यामार्फत चार स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या होत्या.
प्राध्यापक फापाळे यांची मंगळापुर (ता. संगमनेर) येथे सर्वज्ञ फॅब्रिकेशन व फर्निचर ही फर्म आहे. आरोपी फापाळे संगमनेरच्या अमृतवाहिनी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मेकॅनिकल विभागात प्राध्यापक असल्याने त्यांना या व्यवसायाकडे लक्ष देता येत नसल्याने त्यांनी या व्यवसायासाठी भागीदाराची गरज असल्याचे सांगत फिर्यादी मुरलीधर काकडे यांचा मुलगा योगेश काकडे याला या व्यवसायात भागीदार करून घेतले.
त्यासाठी काकडे यांनी नवीन मशिनरी व मालासाठी आरोपीला १० लाख रुपये दिले होते. दरम्यान आरोपीने सर्वज्ञ फॅब्रिकेशन व फर्निचर व्यवसाय फिर्यादीच्या मुलाच्या ताब्यात न देता त्याला कार्यक्षेत्रात फिरण्यास भाग पाडत बराच काळ व्यवसाय बंद ठेवला. त्यानंतर आरोपीने जाणीवपूर्वक फिर्यादीच्या मुलाला त्रास देण्यास सुरुवात केली. शिवीगाळ, भांडण करत फिर्यादीच्या मुलाच्या नकळत सर्वज्ञ फॅब्रिकेशन व फर्निचरमधील सर्व मशिनरी व मालाची परस्पर विक्री करून फर्म बंद केली.
त्यामुळे फिर्यादीच्या मुलाने याबाबत आरोपीकडे विचारणा केली असता आरोपीने त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे फिर्यादी आणि फिर्यादीच्या मुलाने आरोपीकडे फर्मसाठी दिलेली रक्कम तसेच फर्मच्या नफ्याच्या हिशोबाची मागणी केली. हिशोबाअंती फापाळे यांच्याकडून दहा लाख रुपये फिर्यादी काकडे यांना घेणे निघाले. सदर रक्कम एक महिन्यात देण्याचा वायदा आरोपीने केला होता. मात्र एक महिन्यानंतर फिर्यादीने तगादा सुरू केल्यावर आरोपीने प्रत्येकी दीड लाख रुपयांचे दोन आणि साडेतीन लाख रुपयांचे दोन असे एकूण चार धनादेश फिर्यादीला दिले होते.
हे धनादेश न वटता परत आल्याने फिर्यादीने न्यायालयात तक्रार केली होती.
न्यायाधीश डी. एच. दाभाडे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती. तक्रारदार मुरलीधर काकडे व योगेश काकडे यांच्यावतीने ॲड. राजेश भुतडा यांनी न्यायालयीन कामकाज बघितले. त्यांना ॲड. स्वप्निल उपरे, ॲड. नेहा बनबेरू, ॲड. साक्षी भागवत यांनी सहकार्य केले.
न्यायाधीश दाभाडे यांनी दोन खटल्यांचा निकाल दिला असून यात आरोपी प्राध्यापक ईश्वर फापाळे याला प्रत्येकी सहा महिने कारावासाची शिक्षा तर एका खटल्यात सात लाख आणि दुसऱ्या खटल्यात तीन लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. प्राध्यापकाविरोधात सुरू असलेल्या या खटल्याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले होते.