मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संगमनेरमधील वकील शरीफ पठाण आणि त्यांच्या भावावर प्राणघातक हल्ल्याचा प्रकार घडला होता. हल्ल्याच्या घटनेपासून फरार असलेल्या आरोपींना संगमनेरच्या न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आता औरंगाबाद खंडपीठातही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आले आहे.
ॲड. पठाण यांच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेला घरफोडीचा गुन्हा ते मागे घेत नाहीत, या कारणावरून अशपाक इब्राहिम पटेल (रा. साकुर), सादिक रज्जाक शेख, आयाज रज्जाक शेख, आयान सादीक शेख, जुनेद सादीक शेख, कदीर नुरमोहम्मद उर्फ लतिफ शेख, इमरान बशीर शेख (सर्व रा. संगमनेर) यांनी वकील शरीफ शेख आणि त्यांच्या भावाला शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाजवळ कोयता, गज, दांडके, हॉकी स्टिकच्या सहाय्याने मारहाण करत प्राणघातक हल्ला केला होता.
यासंदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात १५ डिसेंबर २०२३ रोजी आरोपी विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०७, ३२४, १५३, १४७, १४९ सह ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेपासून आरोपी फरार होते. फरार असलेल्या आरोपींनी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले होते.
त्यानंतर आरोपींपैकी अश्फाक इब्राहिम पटेल व आयाज रज्जाक शेख यांनी औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीनासाठी दोन स्वतंत्र अर्ज दाखल केले होते. घटनेच्या वेळी आरोपी तेथे उपस्थित नसल्याबाबत व त्या संदर्भात सीसीटीव्ही पुरावे उपलब्ध असल्याबाबत आरोपींच्यावतीने न्यायालयासमोर कथन करण्यात आले. मात्र सदरचे पुरावे हे ऑथेंटिक नसल्याचे व आरोपींचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग होता.
आरोपी सराईत गुन्हेगार असुन अशपाक पटेल हाच या गुन्ह्याचा मास्टरमाईंड आहे. त्याचेबरोबर इतर आरोपींवर घरफोडी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे असे अनेक गुन्हे असल्याचे फिर्यादी ॲड. पठाण यांचे वतीने ॲड. एन. बी. नरवडे यांनी न्यायालयाला सांगितले होते.