बुधवार, दि. ०४ सप्टेंबर
महाराष्ट्रात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले असून दररोज नवीन घटना समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले नगरपंचायतीच्या नगरसेवकानेच बारा वर्षीय अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक असलेल्या हितेश कुंभार याला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
दररोजच्या अत्याचाराच्या आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे महाराष्ट्रात नेमकं चाललय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नगर जिल्ह्यातील अकोले येथे नगरसेवकानेच अल्पवयीन मुलीची छेड काढत तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. आरोपी जबाबदार नागरिक आणि नगरसेवक असल्याने त्याच्या विरोधात जनमानसात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकीकडे महायुतीचे सरकार राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राबवत महिलांना सरकार पाठीशी असल्याची ग्वाही देत असताना दुसरीकडे मात्र महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारीच महिलांवर अत्याचार करत असल्याचे देखील समोर येत आहे. उरण, बदलापूर घटनेची राज्यात सर्वत्र चर्चा सुरू असताना अनेक ठिकाणी महिला अत्याचाराची प्रकरणे समोर आली आहेत. नगर जिल्ह्यातील अकोले येथे भाजप नगरसेवक हितेश कुंभारने इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीची छेडछाड करत तिच्याशी लज्जास्पद वर्तन केल्याची धक्कादायक बाब समोर आली.
तू मला फार आवडतेस असे बोलून तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न नगरसेवक कुंभार यांनी केला. हा सगळा प्रकार क्लासच्या शिक्षिकेने पाहिला व एकच गोंधळ उडाला. या सगळ्या प्रकारानंतर मुलगी पूरती घाबरून गेली व तिने हा सगळा घडलेला प्रकार घरच्यांना सांगितल्यानंतर त्या मुलीला धीर देण्यात आला व त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरून नगरसेवक हितेश कुंभार यांच्यावर मंगळवारी रात्री अकोले पोलीस ठाण्यामध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान नगरसेवक हितेश कुंभार याला अकोले पोलिसांनी अटक करत संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर हजर केले होते. सरकारच्यावतीने सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायाधीश डी. एस. घुमरे गुरुवारपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी दिली.