बुधवार, २५ सप्टेंबर
नाशिक – अपील आदेशाची प्रत देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
राजेंद्र भागवत केदारे (वय ५७) लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात ते कार्यरत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या भावाची पत्नी महिला बचत गटाची अध्यक्ष असून त्यांना नाशिकच्या जिल्हा पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य दुकान मंजूर झाले आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात अपील दाखल करण्यात आले असून या अपीलाचा निकाल तक्रारदाराच्या वहिनीच्या बचत गटाच्या बाजूने लागला होता.
या अपीलाच्या आदेशाच्या निकालाची प्रत देण्यासाठी राजेंद्र केदारे यांनी पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती केदारे यांनी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारली. दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केदारे याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध सोमवारी रात्री नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी, पोलीस नाईक विलास निकम, चालक पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे यांनी मंगळवारी केली.