बुधवार, २५ सप्टेंबर
पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुली, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या एन्काऊंटरची घटना ताजी असतानाच आता पुण्यातून एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेचे तोंड दाबून फरफटत नेत २३ वर्षीय नराधमाने केलेल्या बलात्काराचा प्रकार समोर आला आहे. नराधम आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी या प्रकाराने पुण्यात खळबळ उडाली आहे.
२३ सप्टेंबरला संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास म्हाळुंगेतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला. पीडित वृद्धेच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम आरोपी ओम जयचंद पुरी (वय वर्षे २३, सध्या रा. साखरेवस्ती, मूळ रा. धाराशिव) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरी पाहुणे आल्यामुळे सर्वजण बोलण्यात आणि गप्पा मारण्यात व्यस्त होते. ८५ वर्षीय वृद्ध महिला पाचव्या मजल्यावरील आपल्या फ्लॅटसमोर चालत होती. त्या वेळी तेथे आलेल्या २३ वर्षीय नराधम तरुणाने वृद्ध महिलेला फरफटत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर वृद्ध महिलेचा गळा दाबून तिला मारहाण देखील केली. हा सर्व प्रकार पाऊण तास सुरू होता. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला होता.
जखमी झालेली वृद्ध महिला जिन्यात विव्हळत होती. पाहुणे गेल्यानंतर घरातील मंडळी बाहेर आली. वृद्धेची शोधाशोध सुरू झाली. त्या वेळी महिलेला आपली आई जिन्यात जखमी अवस्थेत विव्हळत पडली असल्याचे दिसले. त्यानंतर वृध्द महिलेने घडलेली आपबिती सांगितली.
सीसीटीव्हीवरून पटली आरोपीची ओळख…
वृध्द महिलेच्या मुलीने पोलिस ठाण्यात फिर्याद देताच पोलिसांनी घटना गांभीर्यने घेत तातडीने तपास सुरू केला. चार दिवसांपूर्वी हा आरोपी इलेक्ट्रिशियन असून सोसायटीमध्ये काम करण्यासाठी आला होता. त्यानंतर पुन्हा सोमवारी हा आरोपी पुन्हा सोसायटीत कामासाठी आला. पाचव्या मजल्यावर असताना त्याने वृद्ध महिलेला पाहिलं. मजल्यावर कोणीच नसल्याचं पाहून त्याने वृद्ध महिलेचं तोंड दाबलं. त्यानंतर नराधमाने वृध्द महिलेला जिन्यातून फरफटत सहाव्या व सातव्या मजल्याच्या जिन्यातील मोकळ्या जागेत नेऊन त्याने हे घृणास्पद कृत्य केलं. पोलिसांनी सोसायटीत जाऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्याद्वारे आरोपीची ओळख पटली. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आरोपीला न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.