बुधवार, २५ सप्टेंबर
अहमदनगर – नगर जिल्ह्यात एका तालुक्याच्या ठिकाणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसाने खाकी वर्दीचा धाक दाखवत आपल्या पत्नीला पळवून नेल्याची तक्रार श्रीगोंदे येथील व्यक्तीने केली आहे. या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मुलांसह उपोषण करण्याचा इशारा या महिलेच्या पीडित पतीने दिला आहे.
यासंबंधीचे निवेदन महिलेच्या पतीने पोलीस अधीक्षकांना दिले आहे. २७ सप्टेंबरपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पीडित पती मुलांसह उपोषणास बसणार असल्याची माहिती समोर आली आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्याने पीडित महिलेच्या पतीवर ही दुर्दैवी वेळ ओढविली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनात पिडीत पतीने म्हटले आहे की, या घटनेमुळे घरातील लहान मुले आईच्या प्रतिक्षेत असून, त्या पोलीस कर्मचाऱ्यास संपर्क साधला असता तो शिवीगाळ करुन धमकावत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
दोन मुले, एक मुलगी आणि पत्नीसह तक्रारदार श्रीगोंदा तालुक्यात राहावयास आहे. तर जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पोलीस ठाण्यात नियुक्ती असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीला नेले असल्याने आपला संसार उध्वस्त झाला असून मायलेकरांची ताटातूट झाली आहे. संबंधित पोलीस कर्मचारी आपल्याला खाकी वर्दीचा धाक दाखवत धमकावत आहे.
सदर पोलिसाला पहिली पत्नी असून, मुले देखील आहेत. पहिली पत्नी असताना त्याने आपली पत्नी नेत तिच्याशी लग्न केले असल्याचे सांगत आहे. खाकी वर्दीचा गैरफायदा घेऊन तो पोलीस आपल्यावर अन्याय करत असल्याचे संबंधित व्यक्तीने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.