गुरुवार, २६ सप्टेंबर
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अब्रुनुकसानीच्या खटल्या प्रकरणी संजय राऊत यांना न्यायालयाने १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. वकील विवेकानंद गुप्ता यांनी या संदर्भात माहिती दिली.
संजय राऊत यांनी डॉ. मेधा सोमय्या आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला होता. हा आरोप खोटा असल्याचा दावा करत मेधा सोमय्या यांनी माजगावच्या न्यायालयात संजय राऊत यांच्यावर १०० करोड रुपये अब्रुनुकसानीचा दावा केला होता.
काय होता आरोप?
मीरा भाईंदरमध्ये शौचालय बांधकामात १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या विरोधात मेधा सोमय्या यांनीच न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने मेधा सोमय्या यांच्या बाजूने निकाल देताना राऊतांना कैदेची शिक्षा आणि दंड ठोठावला.
बावनकुळेंकडून राऊतांना सल्ला
संजय राऊत यांना कैदेची शिक्षा सुनावल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांना सल्ला दिला. न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी आदर केला पाहिजे, पुन्हा या चुका करू नये असं बावनकुळे म्हणाले.