शुक्रवार, २७ सप्टेंबर
पुणे : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून एका महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीवर चार जणांनी बलात्कार केला आहे. या प्रकरणात कोरेगाव पार्क पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
पुण्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोन तरुण हे अल्पवयीन आहेत. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पीडित तरुणी ही कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दितील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. महाविद्यालयात सुरू असलेल्या “गुड टच बॅड टच” या उपक्रमातून ही घटना समोर आली. हा सगळा प्रकार एप्रिलपासून सुरू होता. पीडित तरुणी तिच्या वडिलांच्या फोनवरून सोशल मीडिया वापरत होती आणि यावरूनच आरोपी तरुणांशी तिची मैत्री झाली. दरम्यान, हे चारही आरोपी तरुण एकमेकांना ओळखत नाहीत. या घटना वेगवेगळ्या घडलेल्या आहेत.
यातील एका आरोपीने तिला भेटण्यासाठी बोलावून तिच्यावर महाविद्यालयात बलात्कार केला. तर दुसऱ्या आरोपीने तिच्या घरीच तिच्यावर अत्याचार केला. यातील उर्वरीत दोन आरोपींनी या तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेचे काही व्हिडीओ देखील बनवण्यात आले आहेत.
दरम्यान या सर्व घटना पीडित तरुणीने तिच्या मैत्रिणीला सांगितल्या. त्यानंतर महाविद्यालयात ‘गुड टच बॅड टच’ उपक्रम राबवण्यात आला होता. त्यानंतर याची माहिती त्यांनी या उपक्रमाच्या समुपदेशकाला दिली. त्यातून ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, चारही आरोपींविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, चारही आरोपींना अटक देखील करण्यात आली. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.