शुक्रवार, २७ सप्टेंबर
शेतजमीनीवर कर्ज काढण्यासाठी आवश्यक असलेल्या शेतजमीनीच्या नोंदी फेरफार करुन देण्यासाठी पंचासमक्ष लाचेची मागणी करुन दहा हजार रुपये लाच शासकीय कार्यालयात स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी लावलेल्या सापळ्यात वणीचे तलाठी शांताराम पोपट गांगुर्डे हे अडकले असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या मालकीची कसबे वणी, ता. दिंडोरी येथे गट क्रमांक ६१७ ही शेतजमीन असून त्यावर कर्ज काढावयाचे असल्याने कसबे वणी गावचे तलाठी शांताराम पोपट गांगुर्डे (रा. ध्रुवनगर, मोतीवाला मेडीकल कॉलेजसमोर रेणुका हाईट्स प्लॕट नंबर ९, सातपुर, नाशिक) यांची भेट घेऊन शेतगटाच्या नोंदी मिळणेबाबत विनंती करुन फेरफार नोंदीची मागणी केली. तेव्हा सदर नोंदी या दिंडोरी तहसील कार्यालयात मिळतील असे तक्रारदारास सांगितले.
त्याप्रमाणे तक्रारदार दिंडोरी तहसील कार्यालयात या कामासाठी गेले असता आवश्यक नोंदी मिळाल्या. मात्र सध्याच्या तीन नोंदी वणी येथील तलाठी यांच्याकडे मिळतील असे सांगितले. त्यामुळे तक्रारदार यांनी पुन्हा गांगुर्डे यांची भेट घेतली त्यावेळी नंबर ६१७ च्या उताऱ्यावरील शेतजमीन आकाराबाबतच्या नोंदी चुकीच्या झाल्या असून त्या दुरुस्तीसाठी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली.
परंतु, तक्रारदार यांचा यास विरोध असल्याने त्यांनी लाज लुचपत विभागाकडे तक्रार केली. दिनांक २५ सप्टेंबर रोजी गांगुर्डे यांनी शासकीय पंच साक्षीदार यांच्या समक्ष १० हजारांच्या लाचेची मागणी केली असल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले.
यानंतर आज दि.२६ सप्टेंबर रोजी लावलेल्या सापळ्यावेळी गांगुर्डे यांनी त्यांच्या शासकीय कार्यालयात पंच साक्षीदारासमोर दहा हजार रुपये रोख स्वरुपात लाच स्वीकारली. यावेळी लाच स्वीकारताच पोलिस निरीक्षक नितीन पाटील व सहकारी पथक यांनी गांगुर्डे यांना रंगेहाथ पकडले.
यानंतर त्यांच्या विरोधात वणी पोलिस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून रकमेची कॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
दरम्यान, सदरची कारवाई पोलिस अधिक्षक शर्मीष्ठा वालावलकर, अप्पर पोलिस अधिक्षक माधव रेड्डी वाचक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन पाटील, पोलिस नाईक विनोद चौधरी, पोलिस शिपाई अनिल गांगोडे, चालक पोलिस नाईक परशुराम जाधव यांनी सापळा लावून केली.
या कारवाईमुळे दिंडोरी तालुक्यातील महसुल विभागात खळबळ उडाली असून सदर कारवाईचे त्रस्त शेतकरी व नागरीक यांच्याकडून स्वागत करण्यात येत आहे. तसेच संशयित तलाठ्याच्या उत्पन्नाचे स्त्रोत तपासावे अशी मागणी होत आहे.