शुक्रवार, २७ सप्टेंबर
मुंबई : काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची अज्ञात महिलेकडून नासधूस करण्यात आली आहे. मंत्रालयातील कार्यालयात असणारी फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर लावलेली त्यांच्या नावाची पाटी महिलेने फेकून दिली आहे. कार्यालयाबाहेर असणाऱ्या कुंड्या देखील या अज्ञात महिलेने फेकल्या. हा सगळा गोंधळ घातल्यानंतर ही अज्ञात महिला त्यानंतर तिथून पसार झाली.
मुंबई येथे मंत्रालयात महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सहाव्या मजल्यावर कार्यालय आहे. या कार्यालय बाहेर हा प्रकार घडला.
दरम्यान, ही महिला कोण आहे याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांकडून या महिलेचा शोध घेण्यात येत आहे. तसेच मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अज्ञात महिला कुठून आली? आणि ती मंत्रालयात का शिरली? याबाबत तपास सुरु आहे.
या महिलेवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मंत्रालयातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मंत्रालय सुरक्षा विभागाकडूनही या अज्ञात महिलेचा शोध सध्या सुरू आहे.