रविवार, २९ सप्टेंबर
एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रकार नगरच्या बोल्हेगावमधील गांधीनगरमध्ये समोर आला आहे. पिडीत मुलीच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन संतोष सरोदे (रा. नगर) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी शालेय अभ्यासाविषयीच्या झेरॉक्स काढण्यासाठी घराबाहेर पडली होती. पीडित मुलगी घराबाहेर पडल्याची संधी साधत आरोपीने तिच्या पाठलाग केला. तसेच रस्त्यात तिला गाठत आपल्या दुचाकीवर बसण्याची जबरदस्ती देखील केली.
मात्र पीडित मुलीने आरोपीच्या दुचाकीवर बसण्यास नकार दिल्याने आरोपीने तिला शिवीगाळ करत बळजबरीने दुचाकीवर बसवत बोल्हेगावच्या गांधीनगर परिसरात नेले. तेथे असलेल्या एका खोलीत नेत तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर याबाबत कोणाला काही सांगू नको, कोणाला काही सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
आरोपी विरोधात पीडित मुलीच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.