मंगळवार, ०१ ऑक्टोंबर
कळस :- अकोले तालुक्यातील कळस खुर्द येथे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या आवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात पाणी शेतांमध्ये आणि घरांमध्ये शिरले आहे. मात्र जलसंपदा विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केले असून आदिवासी समाजाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गेले एक महिन्यापासून निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात आले आहे, परंतु त्यामुळे जमिनीचे पृष्ठभाग उपळून आले असून शेतांमध्ये उभे पिक पाण्यात बुडाले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
आदिवासी समाजाच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. घरातून पाणी बाहेर काढण्यासाठी लोक जीवाचे रान करत आहेत. स्वयंपाक करायची आणि झोपायची सोय उरली नाही. काही घरांच्या भीतींना चिरा गेल्या असून कधीही घर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घरातील सदस्य आता रात्री झोपताना देखील या भीतीने ग्रस्त आहेत की, कधी घर पडेल आणि ते मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले जातील. बाहेर झोपायचे तर पाऊस आहे. शौचालयाच्या टाक्या पाण्यामुळे भरल्या आहेत. वाघाच्या भीतीने शौचाला कसे जायचं, शेतात पण पाणी मग रात्रीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
आदिवासी समाजाच्या मरणयातना, आदिवासी समाजातील लोकांचे जीवन आता एका कठीण परिस्थितीला तोंड देत आहे. “आम्ही मरण यातना भोगत आहोत,” असे स्थानिकांनी भावनिक होत सांगितले. पाण्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे त्यांची जगण्याची आशा हरवत आहे. सरकार आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास येथील लोकांचे जीवन आणखी बिकट होईल.
जलसंपदा विभाग व स्थानिक प्रशासनाने या परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. पाणी व्यवस्थापन योग्यरीत्या केले नसल्यामुळे आणि लोकांच्या समस्या दुर्लक्षित केल्यामुळे हे संकट ओढावले आहे. शेतकरी आणि आदिवासी समाजाला आता प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा लक्ष्मण तेलम, गुलाब तेलम, चंद्रकला तेलम, प्रशांत तेलम, अनिता डोके, भाऊसाहेब डोके, केरू डोके, उल्हास तेलम, राघू तेलम, राहुल तेलम, नवनाथ डोके, अजित कडाळे, सचिन तेलम, बाळू तेलम, बाळासाहेब डोके, प्रकाश गिऱ्हे, रामनाथ गिऱ्हे, योगेश मेंगाळ, विठ्ठल गिऱ्हे, ठामा गिऱ्हे, जनाबाई अगविले, साहेबराव आगिवले, सुखदेव पथवे, मधुकर पथवे, विलास पथवे, शिवाजी मेंगाळ यांनी व्यक्त केली आहे.