मंगळवार, ०१ ऑक्टोंबर
कोल्हापूर : जगभरात भारताची होत असलेली प्रगती आणि सांस्कृतिक पुनरुत्थान हे पाहवत नसल्यानं हिंदूविरोधी वातावरण तयार करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
कोल्हापुरात कणेरी इथं सिद्धगिरी मठात आयोजित संत समावेश या कार्यक्रमात ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, हिंदू विरोधाच्या मुकाबल्यासाठी आता संतशक्तीनं पाठबळ द्यावं. लोकसभा निवडणुकीत महायुतीला व्होट जिहादचा फटका बसला असल्याचे स्पष्ट करत ते म्हणाले, लोकसभेच्या ४८ पैकी १४ जागांवर व्होट जिहाद झाल्याचं दिसून आलं. ठराविक वर्गातील लोकांनी हिंदुत्ववादी उमेदवाराला पाडण्यासाठी मतदान केलं.
धुळ्यात पाच विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार जवळपास दोन लाखांनी आघाडीवर होता. पण मालेगावमध्ये दुसऱ्या उमेदवाराला १.९४ लाख मते मिळाली. त्यामुळे तिथं आपल्या उमेदवाराचा पराभव झाला. यामुळे इतर कम्युनिटीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे, त्यांना वाटतं की हिंदुत्ववाद्यांना आपण पाडू शकतो.
निवडणुकीत जय किंवा पराभव महत्त्वाचा नाही पण आपल्याला जिहादच्या या प्रकाराकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे, यावर विचार करायला हवा. आपण कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही, पण जाणीवपूर्वक हिंदूंना त्रास दिला जात आहे.
संतांचीही जबाबदारी आहे की त्यांनी हिंदूंमध्ये जनजागृती करावी. देशात मोठ्या प्रमाणावर गुप्त पद्धतीने धर्मांतरण सुरू आहे. देशात हिंदूंच्या पतनानंतर देशविरोधी कारवाया सुरू झाल्या तर काय? हजारो वर्षे जुनी संस्कृती सुरक्षित ठेवणं आपली जबाबदारी असल्याचंही फडणवीस म्हणाले.