कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांची संकल्पना
मंगळवार, ०१ ऑक्टोंबर
यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगणाऱ्या आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून आणि युवा नेत्या डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून तरुणांना विविध स्पर्धा परीक्षा व वाचनाकरता अद्यावत सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरता राज्यातील आदर्शवत प्रकल्प राबवताना तालुक्यातील नऊ गावांमध्ये अद्यावत अभ्यासिका व ग्रंथालय होणार आहे.
संगमनेर हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र झाले असून अनेक युवक व युवतींना स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांसाठी अभ्यासाची चांगली सुविधा व्हावी. तसेच तालुक्यातील युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी याकरता तालुक्यात नऊ गावांमध्ये युवा संवाद केंद्र अभ्यासिका ग्रंथालय आणि ई लायब्ररी उभारण्यात येणार आहे.
येथे होणार अभ्यासिका व ग्रंथालय…
कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्री थोरात यांनी तालुक्यातील युवकांशी साधलेल्या ‘युवा संवाद’ यातून विविध गावांमध्ये अभ्यासिका व ग्रंथालय करण्याची संकल्पना पुढे आली. याकरता डॉ. जयश्री थोरात यांनी पाठपुरावा केला आणि वाचन संस्कृती वाढवण्याकरता राज्यातील आदर्शवत मॉडेल उभारले जाणार आहे. यामध्ये संगमनेर खुर्द, चंदनापुरी, धांदरफळ बुद्रुक, समनापुर, कोकणगाव, राजापूर, डोळासने, तळेगाव दिघे, नान्नज दुमाला, डिग्रस, निमगाव बुद्रुक व वेल्हाळे येथे हे येथील युवा संवाद केंद्र अभ्यासिका ग्रंथालय आणि ई लायब्ररीच्या विकास कामांसाठी प्रत्येक गावासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला त्यामधून या अद्यावत लायब्ररी निर्माण होणार आहे.
संगमनेर तालुक्यात हे राज्यभरातील पहिलेच मॉडेल ठरणार असून यामुळे तरुण वर्गात वाचन संस्कृती वाढण्यास मोठी मदत होणार असल्याने या अभिनव उपक्रमाचे संगमनेर तालुक्यातील सर्व युवक, युवती महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांनी अभिनंदन केले आहे.
यशोधनमध्ये स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांची सुविधा उपलब्ध…
माजी शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी पुस्तके उपलब्ध व्हावी याकरता यशोधन जनसंपर्क कार्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा, तलाठी, ग्रामसेवक, विविध बँकांच्या परीक्षा, नेट-सेट, नीट, सीईटी, पोलीस भरती, वनरक्षक, जेईई अशा विविध परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली असून तालुक्यातील अनेक युवक व युवती या लायब्ररीचा लाभ घेत आहेत.