बुधवार, २ ऑक्टोंबर
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. बावधन परिसरात घडलेल्या या घटनेत तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पुणे पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या बावधन बुद्रुक मध्ये हेलिकॉप्टर कोसळण्याची ही घटना घडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात धुक्याची चादर पसरली असून या धुक्यामुळेच हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या आधीही मुळशीमध्ये अशा प्रकारची दुर्घटना घडली होती. मात्र त्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती.
पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजता उड्डाण घेतलं होतं. हे उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीन मिनिटात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्ट आणि एचईएमआरएल ही या केंद्र सरकारच्या संस्थेदरम्यान असलेल्या डोंगराळ भागात हेलिकॉप्टरला अपघात झाला. हे हेलिकॉप्टर हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे होते. ऑगस्टा 109 असे या हेलिकॉप्टरचे नाव होते. या हेलिकॉप्टरध्ये कॅप्टन पिल्लई, कॅप्टन परमजीत सिंग असे दोन पायलट आणि प्रीतम भारद्वाज हा इंजिनिअर प्रवास करत होते. मात्र दुर्दैवाने या तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
हेलिकॉप्टर डोंगराळ भागात कोसळल्यानंतर हेलिकॉप्टरचे अनेक तुकडे झाले आणि हेलिकॉप्टरने पेट घेतला. त्यामुळे या परिसरात सर्वत्र धुराचे लोळ पसरले होते.