बुधवार, २ ऑक्टोंबर
वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्काराने डॉक्टर प्रशांत बबनराव नाईकवाडी यांचा रविवारी मुंबईत राज्यपाल सीपी राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक सन्मान करण्यात आला.
नाईकवाडी यांना २०२० या वर्षीचा वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार नुकताच जाहीर झाला होता. कृषि क्षेत्रात संघटनात्मक कार्य करणा-या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो. सेंद्रिय शेतीतील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील आजवरच्या कामगिरीसाठी हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला. नाईकवाडी यांचे सेंद्रिय तसेच अवशेष मुक्त शेतीतील कार्य हे संपूर्ण राज्याला दिशादर्शक असल्यामुळे त्यांची निवड ह्या पुरस्कारासाठी झाली. मुंबईत झालेल्या पुरस्कार वितरणावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे, राज्याच्या कृषी विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज, राज्याचे कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे आदी उपस्थित होते.
नाईकवाडी यांना मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप १,२०,०००/- रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे आहे. डॉ. नाईकवाडी हे महाराष्ट्र राज्याच्या सेंद्रिय शेती धोरण व सेंद्रिय शेतमालाची विपणन व्यवस्था ठरविण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या शासकीय समितीवर सदस्य म्हणून कार्यरत आहे.
तसेच सध्या राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या “रेसिड्यू फ्री & ऑर्गनिक मिशन इंडिया फेडरेशन’ (रोमीफ इंडिया) संस्थेचे अध्यक्ष असून शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेल्या “महाराष्ट्र ऑर्गनिक & रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन’ (मोर्फा) संस्थेचे ते तज्ञ संचालक आहेत. राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर ते सेंद्रिय शेती प्रमाणीकरण अधिकारी म्हणून देखील कार्यरत आहेत.
सेंद्रिय शेतीचे महत्व व त्यातील प्रमाणीकरणाचे तंत्रज्ञान या विषयासाठी त्यांचे मार्गदर्शन टेलिव्हिजन, वृत्तपत्र, आकाशवाणी आदी माध्यमातून शेतकरी, विद्यार्थी, शासकीय व निमशासकीय संस्थांचे अधिकारी, कृषी विद्यापीठे तसेच कृषी अधिकारी यांच्यासाठी सातत्याने आयोजन केले जातात. त्यांची सेंद्रिय शेतीवरील पुस्तके ही मोठ्याप्रमाणात शेतकरी व विद्यार्थी वर्गात प्रचलित असून नुकतेच त्यांचे रासायनिक अवशेषमुक्त शेतीवरील “झिरो रेसिड्यू’ हे नवीन पुस्तक प्रकाशित झाले आहे.
त्यांची राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर सातत्याने व्याख्याने होत असतात. स्वतः अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातून असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या सामाजिक, आर्थिक प्रश्नांची चांगली जाण आहे. स्वतः कृषी क्षेत्रात उच्चशिक्षित असल्याने सेंद्रिय शेतीतील अद्यावत तंत्रज्ञान अगदी सरळ सोप्या भाषेत पोहचविण्याचा त्यांचा नेहमीच कल असतो. सर्व सामान्य शेतकऱ्यासाठी त्यांनी आजपर्यंत जी कामे केलेले आहेत, त्यासाठी त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
सध्या ते ‘रोमीफ इंडिया’ संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यासह देशातील जवळ पास बहुतांश राज्य व नेपाळ, भूतान, बांग्लादेश, श्रीलंका आदी आशियाई देशातील शासकीय व निमशासकीय संस्थांसमवेत कार्यरत आहेत. तसेच राज्यासाठी असणाऱ्या “परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेती’ योजनेत देखील ते मागील पाच वर्ष पी. जी. एस. प्रमाणीकरण प्रणालीचे राज्य सल्लगार म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र शासनाच्या सेंद्रिय शेतीच्या योजना निर्माण करण्यापासून ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचा प्रमुख सहभाग असतो. विविध कृषी विद्यापीठांच्या सेंद्रिय शेती अभ्यासक्रम निर्माता समितीमध्येही ते सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या या प्रतिष्ठीत पुरस्काराबद्दल डॉ. प्रशांत नाईकवाडी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.