बुधवार ०९ ऑक्टोबर
नित्याच्याच बनलेल्या दुचाकी चोऱ्या, महिलांच्या गळ्यातील दागिने पळविणे, रोकड लंपास करणे या घटनांमुळे संगमनेर पोलिसांचे चोरट्यांवरील नियंत्रण पूर्णतः सुटले असल्याचे समोर येत असून ऐन सणासुदीत संगमनेरकर महिला असुरक्षित बनल्या आहे. सातत्याने वाढणाऱ्या या घटनांमध्ये मंगळवारी आणि बुधवारी आणखी भर पडली.
त्यामुळे चोरीची ही मालिका कधी खंडित होणार असा प्रश्न संगमनेरकरांनी उपस्थित केला आहे. चोरट्यांसाठी अतिशय सॉफ्ट ठरलेल्या एसटी बस स्थानकातून महिलेचे दागिने लंपास करण्याच्या घटनेला काही तास होत नाही तोच पुन्हा घडलेल्या घटनांनी पुन्हा एकदा नव्या पोलीस उपअधीक्षक, निरीक्षकांसह पूर्ण पोलिस यंत्रणेला आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळेच की काय पोलिसांकडून चोरीचे स्वतंत्र गुन्हे नोंदविण्याऐवजी एकाच गुन्ह्यात दुसरा गुन्हा दाखविला जाऊ लागला आहे. यामुळे गुन्ह्यांची संख्या कमी दाखविण्याचा पोलिसांचा प्रयत्न असला तरी वास्तविकता लपून राहिलेली नाही.
विशेष म्हणजे शहरात हमरस्त्यावर धूम स्टाईल दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यांनी मंगळवारी दोघांनी भरधाव वेगात मोटार सायकलवरून येत पोलिसांनी गजबजलेल्या पोलीस ठाण्याजवळील संजय गांधी नगर, शहरातील देवी गल्ली परिसरातील राजहंस पतसंस्थे समोरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने घेऊन पोबारा केल्याचे दोन प्रकार समोर आले.
यातील एका घटनेत मीनाक्षी कोरडे या महिलेची १८ ग्राम वजनाची सोन्याची साखळी त्यात काळे मणी असलेले चौकोनी आकाराचे सोन्याचे मिनी गंठण असा सरकारी किमतीनुसार १ लाख ४० हजार रुपयांचा तर दुसऱ्या घटनेत राजश्री खैरनार या महिलेच्या गळ्यातील १ लाख ६० रुपये किमतीची सोन्याची साखळी मिनी गंठण लंपास केले. तर बुधवारी सकाळीच घडलेल्या घटनेत नांदुरी दुमाला येथील शिवनाथ दगडू कवडे हे शहरातील सानप हॉस्पिटल समोर उभे असताना तेथे आलेल्या दोघाजणांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करत हात चलाखी करून फिर्यादीच्या हातातील सुमारे ४३ हजार ५०० रुपये किमतीच्या दोन अंगठ्या लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. याशिवाय बुधवारी सकाळीच शहरात महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीचे प्रकार घडला असल्याची वंदता आहे, मात्र या संदर्भात अद्याप गुन्हा दाखल झालेला नव्हता.
पोलीस यंत्रणेचे चोरट्यांवरील नियंत्रण सुटले… दोन दिवसात दागिने चोरीच्या तीन घटना, सणासुदीत महिलांना फिरणेही बनले धोकादायक
चोरट्यांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान