शनिवार, ०९ नोव्हेंबर
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. उमेदवारांच्या प्रचाराने वेग घेतला असतानाच सांगलीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. मनसेचे माजी जिल्हाप्रमुख आणि भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुधाकर खाडे यांची हत्या झाली आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मिरज-पंढरपूर रोडवरील राम मंदिराजवळ असलेल्या जागेत प्रॉपर्टीच्या कारणावरून खाडे यांचा एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. याच वादातून संशयित व्यक्तीने खाडे यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. यातच खाडे यांचा मृत्यू झाला.
कुऱ्हाडीने वार केल्यानंतर खाडे यांना गंभीर जखमी अवस्थेत मिरजेतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते मृत असल्याचे घोषित केले.
प्राथमिक माहितीनुसार मालमत्तेच्या कारणातून ही हत्या झाली आहे. सुधाकर खाडे हे भाजपच्या स्टार्टअप इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते. २०१४ मध्ये त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. खाडे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला शिवसेनेतून सुरुवात केली होती.
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या प्रकरणाशी निगडित असलेल्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस करीत आहेत.