शनिवार, ०९ नोव्हेंबर
फुल उत्पादक शेतकऱ्यांना फुलाच्या मालाच्या व्यवहाराचे पैसे देण्यासाठी अहमदनगर-पुण्याकडे येत असताना उल्हासनगरमध्ये आचारसंहिता भरारी पथकाच्या तपासणी दरम्यान कारमध्ये असलेल्या साडेसात लाख रुपयांच्या रोकड संदर्भात गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत व्यापाऱ्याकडून ८५ हजार रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात उल्हासनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात तब्बल तेरा दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
२८ ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडल्यानंतर याप्रकरणी १३ दिवसांनंतर ९ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू होता की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये तीन उल्हासनगर महापालिका कर्मचारी आणि दोन पोलिसांचा सहभाग आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात सर्वत्र आचारसंहिता सुरू आहे. आचारसंहिता काळात राज्यातील विविध ठिकाणी भरारी पथकांकडून कारवाई केली जात असून त्यात रोख रक्कम, सोने आणि इतर साहित्य जप्त केले जाते. असे असताना ऑक्टोबर महिन्यात भरारी पथकाच्या तपासणी दरम्यान घडलेल्या एका प्रकाराबद्दल स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीसांतील वरिष्ठांना माध्यम प्रतिनिधींनी जाब विचारल्यानंतर वेगाने सुत्रे हलली. त्यानंतर यातील सर्वांचे जबाब नोंदवण्यात आले.
अखेर उल्हासनगर महापालिकेचे सहायक आयुक्त आणि सध्या उल्हासनगर विधानसभेचे आचारसंहित पथक प्रमुख सुनिल लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या पाच जणांवर १३ दिवसांनंतर खंडणी आणि आचारसंहिता पालनात कसूर केल्याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
काय घडले होते… २८ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे पाचच्या सुमारास व्यापारी बबन आमले आणि त्यांचे मित्र नितीन शिंदे आपल्या चारचाकीने कल्याणवरून अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील फूल उत्पादन शेतकऱ्यांना दसऱ्यात विक्री झालेल्या मालाचे रोख पैसे घरपोच देण्यासाठी जात होते. त्यावेळी येथे असलेल्या भरारी पथक क्रमांक सहाचे प्रमुख संदीप शिरसवाल यांनी त्यांची तपासणी केली. त्यावेळी त्यांच्याकडे ७ लाख ५० हजार रूपये रोख सापडले. याबाबत पथकप्रमुखांनी त्यांना गुन्हा दाखल होण्याची भीती दाखवली. त्यावेळी आमले यांनी या रोख रकमेबाबत पावत्याही दिल्या. मात्र त्यानंतरही शिरसवाल यांनी दोघांकडून ८५ हजार रूपये खंडणी स्वरूपात काढून घेतले. या चौकशीवेळी चित्रिकरण आले नसल्याची बाब समोर आली आहे. या प्रकाराची माहिती भरारी पथक क्रमांक ३ चे प्रमुख संकेत चनपूर यांना होती. मात्र त्यांनीही शिरसवाल यांच्या कृत्याला मुकसंमती दिली. तसेच पथकातील आण्णासाहेब बोरूडे, पोलिस हवालदार विश्वनाथ ठाकूर, पोलीस राजरत्न बुकटे यांनी वरिष्ठांना माहिती दिली नाही.