रविवार, १० नोव्हेंबर
दुचाकीवर मुलीला घेऊन संगमनेरकडे येत असताना निंबाळे गावच्या शिवारात एका तरुणाने दुचाकीला कट मारला. त्यामुळे कट का मारला असे विचारण्यात आले असता दुचाकीला कट मारणाऱ्या तरुणाने बापलेकीला बेदम मारहाण करण्याची घटना घडली. या घटनेमुळे संतप्त झालेले ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. आंदोलनकर्त्यांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अखेरीस पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतल्यानंतर तणाव शांत होण्यास मदत झाली.
राज्यासह संगमनेर आणि लगतच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. एकीकडे निवडणूक प्रचार शिगेला जात असताना दुसरीकडे हा प्रकार समोर आला. दोन धर्मीयात झालेल्या वादाचे परिणाम जातीय तणावात निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील निंबाळे चौफुलीवर ही घटना घडली. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे शहरात पसरल्याने लगेचच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. तसेच संतापलेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले होते. शहरातील हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळाकडे धावले. तसेच महायुतीचे उमेदवार अमोल खताळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार योगेश सूर्यवंशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष अभिजीत घाडगे, पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश थोरात, सुनील थोरात, ॲड. नानासाहेब थोरात, बजरंग दलाचे तालुका कार्यवाह कुलदीप ठाकूर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष तुषार ठाकूर यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले.
घटनेची माहिती मिळताच संगमनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी पोहोचले होते. अडीच तास सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित आरोपीला ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच संबंधित तरुणाला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी आयटीबीपी पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार काय घडली होती घटना… मुलीला पुणे येथे जाण्यासाठी सोडण्याकरिता तिचे वडील तिला घेऊन संगमनेरकडे येत होते. निंबाळे फाटा येथे त्यांच्या गाडीला आयान बेग या युवकाने कट मारला. गाडीला कट का मारला असा जाब या युवकाला विचारला याचा राग आल्याने त्याने जाब विचारणार्यास मारहाण केली. वडिलांना मारहाण होत असल्याचे पाहून त्यांची वीस वर्षीय मुलगी गाडीच्या खाली उतरली. तिनेही या युवकाला जाब विचारला. त्याने या मुलीलाही मारहाण केली. या मारहाणीचे वृत्त वाऱ्यासारखे सर्वत्र पसरले. तालुक्यातील एका युवतीवर अन्याय होत असताना याकडे काहीजण सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला.