संगमनेर हादरले, सुभाष लोळगे यांच्या कान्हा ज्वेलर्सवर दरोडा
दुचाकीवरून आले पाच दरोडेखोर…
सोमवार, ११ नोव्हेंबर
संगमनेर – संगमनेरच्या साकुरमधून खळबळ माजविणारी घटना समोर आली आहे. हवेत गोळीबार करत दरोडेखोरांनी ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकत दागिन्यांची लूट केली आहे. साकुर मधील सुभाष लोळगे यांच्या कान्हा ज्वेलर्स या दुकानात दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून परिसरात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
साकुर बस स्थानकाजवळ गजबजलेल्या परिसरात निखिल सुभाष लोळगे यांचे ‘कान्हा ज्वेलर्स’ नावाने सोन्याचे दागिने विक्रीचे दुकान आहे. पावणे दोन वाजण्याच्या सुमारास दुकानातील कामगार जेवण करण्यासाठी गेले असता दुकानात एक कामगार असल्याचे संधी साधून पल्सर दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी दुकानासमोर हवेत गोळीबार करत दुकानात प्रवेश मिळविला.
दुकानात घुसत त्यांनी दुकानातील कामगाराला बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील संपूर्ण सोने, दागिने लुटून नेले. भर दिवसा दरोडेखोरांनी अख्खे दुकानच लुटून नेल्याने परिसरात मोठी खळबळ माजली आहे. घटनास्थळी विविध पोलीस पथके दाखल झाले आहेत. नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली आहे.
भर दिवसा घडलेल्या दरोड्याचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कापडाने तोंड बांधलेल्या पाचही दरोडेखोरांनी दुकानातील गंठण, चैन, मंगळसूत्र, वाट्या, मिनी गंठण, टॉप्स, बाळ्या आदी प्रकारचे सोन्याचे दागिने लुटून पारनेरच्या दिशेने पलायन केले. पोलिसांनी दरोड्याची माहिती घेत तपासासाठी तातडीने दरोडेखोरांच्या मागावर पथक पाठविले आहे.
दरम्यान रस्त्याने जाणाऱ्या दरोडेखोरांना आडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मांडवे फाटा, खडकवाडी या ठिकाणी देखील आडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर फायरिंग केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यासह साकुरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.