सोमवार, ११ नोव्हेंबर
संगमनेर – शहरातील नवीन नगर रस्त्यालगत असलेल्या जठार हॉस्पिटल पाठीमागे सोमवारी दुपारी चार साधूंना दोन जणांनी मारहाण करण्याची घटना घडली. मारहाणीत जखमी झालेल्या साधूंवर घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली आहे.
पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (११ नोव्हेंबर) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साधू वेश्यातील चार लोक जठार हॉस्पिटल पाठीमागून नवीन नगर रस्त्याकडे जात असताना दोन अनोळखी तरुणांनी त्यांना रस्त्यात आढळून मारहाण केली. मारहानीनंतर आरोपी पसार झाले होते. तर साधूंना उपचारासाठी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज मिळविले. या फोटोच्या आधारे मारहाण करणाऱ्या दोन्ही अनोळखी तरुणाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. पळून गेलेल्या या दोन्ही तरुणांचा शोध घेण्यासाठी तीन पोलीस पथके त्यांच्या मागावर पाठविण्यात आले आहे.
दरम्यान चार साधून पैकी विलास मारुती वडागळे (वय ४८ वर्ष, सिद्धार्थ नगर, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या जबाबावरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन तरुणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ९४३/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२६(२), ११५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चारही साधूंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शहर पोलीस निरीक्षक देशमुख यांनी आरोपींना पकडून लवकरात लवकर अटक केली जाणार असल्याची माहिती दिली असून या घटनेच्या अनुषंगाने कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवा शहरात पसरवू नये. कोणत्याही व्यक्तीने कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास अथवा अफवा पसरविल्यास त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
अशांतता निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत सातत्याने… सध्या विधानसभा निवडणूक सुरू असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्क झाले असली तरी रविवारी शहरालगतच्या निंबाळे गावात घडलेल्या घटनेमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पाठोपाठ सोमवारी दुपारी तालुक्यातील साकुर येथे भर दिवसा सुवर्ण व्यावसायिकाच्या दुकानावर दरोडा टाकून लुटण्यात आले. या घटनेमुळे खळबळ उडाली असतानाच याच दरम्यान शहरात साधूना मारण्याची घटना समोर आली आहे. तणाव टाळण्यासाठी पोलीस यंत्रणांकडून तत्परतेने पाऊले उचलण्यात आले असून मारहाण करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.