मंगळवार, १२ नोव्हेंबर
सर्वधर्म समभावाचे आणि शांतता असलेल्या संगमनेरमध्ये हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने नांदत असताना काही राजकीय शक्ती फक्त राजकारणासाठी विनाकारण दोन समाजात वाद पेटवत आहे. सोमवारी मारहाण झालेल्या घटनेतील साधू आणि मारहाण करणारे दोन्ही हिंदू समाजाचे असून केवळ बुद्धिभेद करून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. ज्यांनी साधूना मारहाण केली त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी संगमनेर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी केली आहे.
कतारी यांनी म्हटले आहे की, सध्या राज्यभर निवडणुकीचे वातावरण आहे. संगमनेर शहर हे शांतता प्रिय आहे. परंतु काही शक्ती संगमनेर शहरात तणाव निर्माण करण्यासाठी सक्रिय झाल्या आहेत. हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी ही अदृश्य शक्ती काम करत आहे.
हिंदू साधूंना झालेली मारहाण ही दुर्दैवी असून मारणारे सुद्धा हिंदूच आहेत. या गोष्टीचे राजकारण कोणी करू नका. शेवटी मानवता हा धर्म आहे. आणि हिंदू धर्माने नेहमी मानवतेची शिकवण दिली आहे.
काही जातीयवादी शक्ती आपल्या राजकीय पोळी भाजण्यासाठी हे उद्योग करत आहेत. आणि हे सुजाण संगमनेरकरांना मान्य नाही. त्यामुळे तरुणांनी सोशल मीडियाच्या आहारी न जाता सत्यता तपासावी संगमनेरमध्ये अशांतता निर्माण करू पाहणाऱ्यांना वेळीच रोखावे. जातीय तेढ निर्माण करणे आणि राजकारण करणे ही भाजप प्रणित पक्षांची कूटनीती असून कोणीही भूलथापांना बळी पडू नका व ज्यांनी हिंदू साधूंना मारहाण केली असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
माध्यमांनी जबाबदारीने वृत्त देण्याची आवश्यकता…
अशा घटनांमध्ये माध्यमांनी पूर्णतः खातरजमा करून बातम्या देणे अपेक्षित आहे. मात्र काही माध्यम कोणतेही खात्री न करता अशा घटनांना थेट हिंदू मुस्लिम वादाचे स्वरूप देत असून माध्यमांनी पूर्णतः खात्री करूनच जबाबदारीने वृत्त दिले पाहिजे. आपल्या बातम्यांच्या आधारे नागरिक मत बनवत असतात. त्यामुळे माध्यमाने समाजात चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करू नये. माध्यमांच्या माध्यमातून समाजात शांतता निर्माण करण्यास मदत व्हायला हवी, असे देखील कतारी यांनी म्हटले आहे.