मंगळवार, १२ नोव्हेंबर
पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर पोलीस उपनिरीक्षकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाण्याजवळ सोमवारी रात्री काढली. जखमी पोलीस उपनिरीक्षकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याची माहिती समोर येत आहे.
प्रकाश अभिमान नेमाणे असे जखमी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून पोलीस उपनिरीक्षकावरच हल्ल्याचा प्रकार घडल्याने या घटनेमुळे नाशिकच्या पंचवटी परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात नेमाणे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पंचवटी परिसरात दुसऱ्यांदा पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आले असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहे.
अशी घडली घटना… पंचवटी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रकाश अभिमान नेमाणे हे नेहमीप्रमाणे आपली ड्युटी करून सोमवारी (दि. ११) रात्री १० वाजेच्या सुमारास दिंडोरी रोडवरून घरी जात होते. वज्रेश्वरी झोपडपट्टी परिसरात दोन मद्यपी रस्त्यावर धिंगाणा घालत असल्याचे नेमाणे यांना दिसले. नेमाणे यांनी त्यांना हटकले. याचा राग अनावर झाल्याने मद्यपींनी दगडाने नेमाने यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.
या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, गुन्हे शोध पथकाच्या टीमला संशयितांच्या मागावर पाठवून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले आहेत.
यापूर्वी देखील घडली होती अशीच घटना…
पंचवटी परिसरातील दिंडोरी नाक्यावर ४ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विकी संजय जाधव ऊर्फ गटया (रा. अवधूत वाडी, पंचवटी) हा हातात चाकू घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत होता. यावेळी मध्यवर्ती गुन्हे शाखेतील सहायक पोलीस उपनिरीक्षक नामदेव कारभारी सोनवणे (वय ५७, रा. धात्रक फाटा, पंचवटी) हे त्याच रस्त्याने घरी जात होते. त्यांनी नागरिकांचा जीव वाचविण्याच्या हेतूने संशयितांकडून चाकू हिसकावण्याचा प्रयत्न केला असता, गट्याने थेट चाकू सोनवणे यांच्या पोटात खुपसल्याची घटना घडली होती.