मंगळवार १२ नोव्हेंबर
संगमनेर – भरदिवसा दीड वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील साकुरच्या गजबजलेल्या बस स्थानक चौकातील कान्हा ज्वेलर्सवर गावठी कट्टाचा भाग दाखवून तसेच हवेत फायर करून दुकानात दरोडा टाकत पन्नास लाखाहून अधिक किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन फरार झालेल्या पाचपैकी दोघा दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे. उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. दरोडा प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय बाळासाहेब वावरे, (वय 24 वर्षे, रा. माळेगांव, येळे ढाळे वस्ती, ता. बारामती जि. पुणे) व स्वप्नील किशोर येळे, (वय 22 वर्षे, रा. माळेगांव, येळे ढाळे वस्ती, ता. बारामती जि. पुणे) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सोमवारी दुपारी साकुर येथे घडलेल्या घटनेनंतर पाचही दरोडेखोरांनी दोन दुचाकी वरून पारनेरच्या दिशेने पलायन केले होते. तसेच रस्त्यात त्यांना आडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर देखील त्यांनी हवेत फायर करून दहशत निर्माण केली होती. भर दिवसा आणि गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. दरोड्याचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला आहे. या आधारे आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके कार्यरत आहे.
स्थानिक पोलिसांसह अहिल्यानगर गुन्हे शाखेचे पोलीस, पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस आरोपींच्या मागावर होते. दरम्यान पाच दरोडेखोरांपैकी दोन दरोडेखोरांना पारनेर तालुक्यात जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले आहे. तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही दुचाकी देखील ताब्यात घेण्यात आल्या आहे. उर्वरित ३ दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साकूर येथे बसस्थानकाजवळ बाजारपेठेत सोन्या-चांदीचे व्यावसायिक निखिल सुभाष लोळगे यांचे कान्हा ज्वेलर्स हे दुकान आहे. दुकानात दुपारी दीडच्या सुमारास फिर्यादी संकेत सुभाष लोळगे समाजी जोरे नावाच्या ग्राहकासोबत बोलत असताना तोंड बांधलेल्या पाच जणांनी अचानक दुकानात प्रवेश केला. त्यांनी फिर्यादीला गावठी गटाचा धाक दाखवून दुकानात असलेले सोन्या-चांदीचे दागिने बॅगमध्ये भरले. सर्व दागिने बॅगमध्ये भरल्यानंतर गल्ल्यातील ९० हजार रुपयांची रोख रक्कमदेखील त्यांनी काढून घेतली. मालकाचा मोबाईलही हिसकावत पाचही दरोडेखोर दुचाकींवर बसून सर्वांसमोरून पारनेरच्या दिशेने सुसाट निघून गेले.
पुढे मांडवा फाटा येथे नागरिकांनी धाडस करून त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी पुन्हा हवेत गोळीबार केला. पुढे खडकवाडी रस्त्याला दरोडेखोरांनी दुकान मालकाचा मोबाईल फेकून दिला. पुन्हा खडकी रस्त्यावर गोळीबार करून ते पारनेरच्या दिशेने निघून गेले. भरदिवसा घडलेल्या या घटनेने नागरिक भयभीत झाले आहेत.
माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, संगमनेरचे पोलिस उपअधीक्षक कुणाल सोनवणे, घारगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे फौजफाट्यासह साकूरमध्ये दाखल झाले. नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनंतर अधिकार्यांनी आपापल्या वाहनांतून पारनेरच्या दिशेने पाठलाग केला. पोलिस अधिकार्यांसह श्वानपथकानेही तपासाला सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत पारनेर, आळेफाटा, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोलिस दरोडेखोरांचा माग काढत होते.
दरम्यान पाच दरोडेखोरांपैकी दोन दरोडेखोराना पारनेर तालुक्यातील कुरणवाडी–जांभुळवाडी परिसरातून ग्रामस्थांच्या मदतीने जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले आहे.