संगमनेरचा वाघ राज्यात गर्जना करतो यांना मतदारसंघाच्या बाहेर पडता येईना
आ. थोरात यांना दोन लाखाचे मताधिक्य देण्याची आवाहन
संगमनेर – प्रतिनिधी
आमदार बाळासाहेब थोरात यांची सुसंस्कृत नेता म्हणून राज्याला ओळख आहे. दडपशाही करणाऱ्यांना आम्ही दक्षिणेत झटका दिला आहे. वाघाची झुल मांजराने अंगावर घेतल्याने कोणी वाघ होत नाही. तो टायगर नव्हता. खरा टायगर हा संगमनेरमध्ये असून येत्या विधानसभेत संगमनेरमधील खबरीलालचा राजकीय कडेलोट करा. थोरात यांना दोन लाखाच्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन खासदार निलेश लंके यांनी केले.
युवक काँग्रेस व महाविकास आघाडीच्यावतीने तळेगाव दिघे येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अमित देशमुख, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
लंके म्हणाले, संगमनेर तालुक्यात संस्कृती आहे तर शेजारी राहता तालुक्यात दडपशाही आहे. विकास आणि गोरगरिबांचे कामे करून आमदार थोरात यांनी हा तालुका निर्माण केला आहे. नगर दक्षिणेमध्ये त्यांना मोठा झटका दिला आहे. संगमनेर हे तर आमदार थोरात यांचे होमपिच आहे. संगमनेरचा वाघ राज्यात गर्जना करतो आहे. आणि राहता मतदार संघाच्या बाहेर यांना पडता येत नाही. आता त्यांचे कायमचेच ग्रहमान फिरले आहे.
समोरचा उमेदवार तोतया खबरीलाल आहे. या खबरीलालचा राजकीय कडेलोट करून आमदार बाळासाहेब थोरात यांना दोन लाखांच्या मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार थोरात म्हणाले, निळवंडे धरणासाठी आपण काम केले. कालवे पूर्ण केले. ज्यांनी कोणतेही योगदान दिले नाही त्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. परंतु जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. आगामी काळामध्ये कालव्यांच्या वरच्या बाजूला पाणी देण्यासाठी योजना राबवल्या जातील.
संगमनेरमधील खबरीलालचा राजकीय कडेलोट करा – खा. निलेश लंके
तळेगाव दिघे येथील मेळाव्यात विखेंवर टीका