बुधवार १३ नोव्हेंबर
संगमनेर मतदार संघात स्वतःला टायगर संबोधणाऱ्यांनी या मतदारसंघातील दहशतीचा मुद्दा समोर आणत परिवर्तनासाठी साद घातली आहे. मात्र त्यांची परिवर्तनाची साद ही केवळ सत्तेच्या लालसेने असून आमची परिवर्तनाची साद सामान्यांच्या, वंचितांच्या हक्कासाठी असल्याचे वंचितचे संगमनेर विधानसभेतील उमेदवार अजीज वोहरा यांनी म्हटले आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघातून उभ्या असलेल्या दोन मोठ्या शक्ती विरोधात, आर्थिक बलाढ्य उमेदवारांविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून अजीज वोहरा निवडणूक लढवत आहे. एकीकडे सहकाराच्या माध्यमातून निर्माण केलेले मोठे साम्राज्य सत्ता कायम राखण्यासाठी तर दुसरीकडे प्रवरेची यंत्रणा तालुक्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुढे सरसावली आहे.
मात्र वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्वसामान्य घरातील उमेदवार देऊन डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने वंचित घटकातील सामान्य माणसाला न्याय दिला आहे. त्यामुळे या राज्यात बदल घडवण्याची ताकद केवळ वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यातच आहे.
आंबेडकर यांच्या माध्यमातून वंचितांचा आवाज बुलंद झाला असून एससी, एसटी, ओबीसी, मुस्लिम यांचे आरक्षण केवळ आणि केवळ डॉ. आंबेडकरच वाचवू शकतात. राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असल्याने याच मुद्यावर वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. आरक्षणाचा फॉर्म्युला वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडेच असल्याने राज्यातील विविध मतदार संघात वंचितने आपले उमेदवार उभे केले आहेत.
शेतकऱ्यांचे प्रश्न, अनुदानाचा मुद्दा, शिक्षणाची अवस्था, दिव्यांगाच्या सुविधा अशा मुद्यांवर वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक लढवीत आहे. लाडकी बहीण योजनेतून महिलांना आर्थिक लाभ दिल्याचा ढोल बडविला जात आहे मात्र तेलाचे दर, किराणा मालाचे दर, पेट्रोल-डिझेलचे दर, जीवनावश्यक वस्तूचे दर, शेतीमालाचे दर वाढवून त्याच्या कितीतरी पट अधिक रक्कम या सरकारने आपल्या खिशातून काढूनही घेतले हा मुद्दा घेऊन आम्ही मतदारांसमोर जात असल्याचे ते म्हणाले.