बुधवार १३ नोव्हेंबर
संगमनेर – सोमवारी तालुक्यातील साकुर येथे भरदिवसा कान्हा ज्वेलर्सवर दरोडा टाकून संपूर्ण दुकान लुटून नेणाऱ्या दरोडेखोरांपैकी दोघांना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले. या दोन्ही आरोपींना बुधवारी पोलीस कोठडी मिळण्यासाठी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना १८ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता अन्य तीन प्रमुख आरोपींसह चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळविण्यासाठी पोलिसांचे कसब पणाला लागणार आहे.
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गजबजलेल्या साकुरच्या बस स्टॅन्ड परिसरात असलेल्या कान्हा ज्वेलर्स दुचाकीवरून आलेल्या पाच दरोडेखोरांनी तीनदा हवेत गोळीबार करत दुकानदाराला गावठी कट्ट्याचा धाक दाखवत दरोडा टाकण्याचा प्रकार घडला होता. या दरोड्यात ५० लाखापेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी चोरून नेला. दरोड्याचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला होता.
पारनेरच्या दिशेने पळून गेलेल्या दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके तैनात करण्यात आली होती. शिक्री गावाजवळ दरोडेखोरांनी दरोडात वापरलेल्या दुचाकी सोडून दरीत उड्या टाकून पलायन केले होते. रात्रभर पोलीस पथकांनी शोध घेतल्यानंतर सकाळी दोघा दरोडेखोरांना पकडण्यात पथकाला यश आले तर तिघेजण अद्यापही फरार आहेत. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी जप्त केल्या आहे.
अक्षय बाळासाहेब वावरे (वय २४ वर्ष) व स्वप्निल किशोर येळे (वय २२ वर्ष) दोघे रा. माळेगाव, बारामती अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून अन्य तिघा आरोपींची नावे देखील पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.
पोलिसांच्या वतीने सरकारी वकील मिराज पर्बत यांनी आरोपींनी केलेल्या गंभीर गुन्ह्याचे स्वरूप न्यायालयासमोर विषद करत आरोपींना दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीमती यु. डी. जाधव यांनी आरोपींना १८ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याच्या आदेश दिले.