बुधवार, २७ नोव्हेंबर – संगमनेर
नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवशी आयोजित करण्यात आलेल्या संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या विजयी सभेत अज्ञात चोरट्याने अहिल्यानगरमधील व्यावसायिकाची ५० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलिसात तक्रार दाखल – दरम्यान या संदर्भात हिंगणगाव जि. अहिल्यानगर येथील दीपक रामभाऊ सोनवणे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालपाणी लॉन्सवर घटना – संगमनेर विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे यांचा वाढदिवस होता. संगमनेरमधून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांची विजयी सभा आणि विखे यांचा वाढदिवसाचा एकत्रित कार्यक्रम मालपाणी लॉन्स येथे रविवारी (२४ नोव्हेंबर) आयोजित करण्यात आला होता. यावेळी ही घटना घडली.
नेमकं काय घडलं – सोनवणे या कार्यक्रमावेळी आपले मित्र संजय परशुराम शिंदे, दिलीप दाते, छबुराव कांडेकर, संजय गिरवले यांच्यासह मालपाणी लॉन्स येथे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. रविवारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास सभेच्या ठिकाणी स्टेजवर सुजय विखे यांना शुभेच्छा देण्यासाठी ते गेले त्यावेळी स्टेजवर गर्दी होती. गर्दी असल्याने स्टेजवरून खाली उतरत असताना त्यांना कोणीतरी धक्का दिला.
सोन्याची ५० ग्रॅम वजनाची चैन लांबविली – त्यानंतर काही वेळाने सोनवणे यांनी त्यांच्या गळ्याला हात लावला असता त्यांना गळ्यात ५० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन दिसून आली नाही. त्यांनी स्टेजवर शोध घेतला मात्र ती सापडली नसल्याने ती कोणीतरी काढून चोरून नेली.
पोलीस तपास – मालपाणी लॉन्स येथे सभेच्या स्टेजवरून कोणीतरी अज्ञात इसमाने गळ्यातून सोन्याची चैन काढून चोरून नेली, यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ९७५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार पुढील तपास करत आहे.