महाराष्ट्र संवाद – गुरुवार, २८ नोव्हेंबर
नाशिक – लासलगावच्या दत्तनगरमधील अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
अतिष दगडु ढगे (वय २४ रा. टाकळी विंचुर, ता. निफाड, जि. नाशिक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. निफाडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश बा. द. पवार यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती बंगले यांनी काम बघितले.
६ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपीने पीडित मुलीच्या घरामध्ये अनाधिकाराने प्रवेश करत फिर्यादीच्या १७ वर्षीय वयाच्या मुलीस ‘तू तुझ्या मित्र-मैत्रिणींसोबत का फिरते, अशी विचारणा करत यावरून वाद घालत कुरापत काढून फिर्यादीच्या मुलीच्या अंगावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच स्वतःच्या अंगावरही वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अशा आशयाची फिर्याद पीडित मुलीच्या आईने लासलगाव पोलीस ठाण्यात दिली होती.
सन २०१९ मध्ये लासलगावसारख्या भरवस्तीत अल्पवयीन मुलीवर हल्ला झाल्याने हे प्रकरण खूप गाजले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव राजवे, शिवचरण पांढरे यांनी याप्रकरणी तपास करत आरोपी विरोधात निफाड न्यायालयात आरोप पत्र दाखल केले होते. न्यायालयाने आरोपी अतिष दगडु ढगे यांस भारतीय दंड विधान कलम ३०७ मध्ये दोषमुक्त, कलम ४५२ मधे ३ वर्ष सक्तमजुरी व १००० रु दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैद तर कलम ३०९ मधे ३ महिने साधी कैद व १००० रु दंड तसेच दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैदेची सजा ठोठावली.