मंगळवार, ०३ डिसेंबर – संगमनेर
व्यापाऱ्यांकडून मालाची खरेदी करून त्यांना फोन पे वर पैसे पाठविल्याचे सांगत फसवणूक करणाऱ्या बंटी बबलीची जोडी अखेर संगमनेर पोलिसांच्या ताब्यात आली आहे. एका व्यापाऱ्याच्या सतर्कतेमुळे शहरातील नाटकीनाला परिसरात सोमवारी दुपारी या जोडीला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्हा दाखल – गेल्या तीन-चार महिन्यांपासून शहरातील विविध व्यापाऱ्यांना फसवणुकीचा हा प्रकार सुरू होता. बंटी-बबलीची ही जोडी सिन्नरमधील असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी महेश कर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बंटी बबलीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील करत आहेत.
याबाबत माहिती अशी, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील बंटी-बबलीचे हे जोडपे तीन ते चार महिन्यांपूर्वी संगमनेर येथे राहण्यासाठी आले. त्यानंतर ही जोडी संगमनेर येथील किराणा व्यापाऱ्यांकडून तेलाचे डबे, सिगारेट पाकीट यासह इतर किराणा माल घेत असे. दुकानात असलेले फोन पे चे कोड त्यांच्या मोबाईलवर स्कॅन करून दुकानदाराला फोन पे वर पैसे सक्सेसफुल झाल्याचा मेसेज दाखवत असत आणि माल घेवून तेथून नौ दो ग्यारा होत. प्रत्यक्षात व्यापाऱ्याच्या खात्यात पैसे जमा होत नव्हते.
शोध घेण्यात पोलिसांना अपयश – मागील तीन ते चार महिन्यांपासून हे सर्व प्रकार सुरू होते. बंटी बबलीची ही जोडी अनेक दुकानातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रीत होत असे. त्याच बरोबर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात काही व्यापाऱ्यांनी या बंटी-बबली विरोधात तक्रार अर्ज देखील दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला पण त्यांना काही यश आले नाही.
अखेर बंटी बबली व्यापाऱ्याच्या जाळ्यात – सोमवारी दुपारी बंटी बबलीची जोडी संगमनेर शहरातील नाटकी नाला परिसरात असलेल्या महेश कर्पे यांच्या श्रीराम किराणा दुकानामध्ये आली. तेथे त्याला सह अन्य काही वस्तू खरेदी केल्यानंतर दुकानदाराला स्कॅनरच्या सहाय्याने पेमेंट केल्याचे भासवून फसवण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्यक्षात पेमेंट झाले नसल्याचे खात्री झाल्याने फसवणुकीचा हा प्रकार दुकानदाराच्या लक्षात आला.
५० वर व्यापाऱ्यांची फसवणूक – त्यामुळे दुकानदाराने या बंटी बबलीला व त्यांच्यासोबत असलेल्या एका साथीदाराला पकडले. त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी त्वरित पोलिसांना बोलावून या बंटी बबलीला पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत ‘संगमनेर व्यापारी असोसिएशन’ या व्हाट्सअप ग्रुपवर व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बंटी-बबलीला पकडल्याची बातमी समजताच फसवणूक झालेले सर्व व्यापारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जमा झाले. जवळपास ५० च्या आसपास व्यापाऱ्यांची या बंटी बबलीने फसवणूक केल्याचे समजते.