लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी संगमनेर तालुका एकवटला
बुधवार, ०४ डिसेंबर – संगमनेर
सततच्या अविश्रांत कामातून संगमनेर तालुक्याला विकसित आणि वैभवशाली बनवणारे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात आनंद निर्माण केला. संगमनेर तालुक्याच्या विकासाची घडी बसवली. कार्यकर्त्यांची मोठी फळी असताना अनपेक्षित निकालामुळे संपूर्ण राज्यात हळहळ निर्माण झाली. यानंतर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर हजारो कार्यकर्त्यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली तर अनेकांना अश्रू अनावर झाले.
प्रगतशील व सुसंस्कृत तालुका – १०० किलोमीटर विस्तार असलेल्या तालुक्यातील १७१ गावे आणि २५८ वाड्या-वस्त्यांवर सातत्याने विकास कामे राबवताना संगमनेर तालुका त्यांनी परिवार मानला. तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखात बाळासाहेब थोरात हे नेहमी सहभागी झाले. सर्व समाजाला बरोबर घेऊन आदर्शवत राजकारण केले. प्रगतशील व सुसंस्कृत तालुका करून संगमनेरची ओळख राज्यात पोहोचवली. विविध मंत्री पदाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात अनेक विकासाच्या योजना राबवल्या. समृद्ध सहकार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, भरलेली बाजारपेठ, ग्रामीण विकास, वैभवशाली इमारती, दूध व्यवसाय, आर्थिक संपन्नता ही संगमनेर तालुक्याची वैशिष्ट्य राहिली.
स्नेह मेळाव्यातून संवाद – विधानसभा निवडणुकीत झालेल्या अनपेक्षित निकालामुळे तालुक्यातील प्रत्येक कुटुंबात मोठी हळहळ निर्माण झाली. यानंतर राज्यभरातून विविध जिल्ह्यांमधून अनेक कार्यकर्ते संगमनेरात आले. अनपेक्षित निकालाच्या पार्श्वभूमीवर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सर्व कार्यकर्त्यांशी स्नेह मेळाव्यातून संवाद साधला.
४० वर्षाच्या कामाचा आढावा – निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले दुष्काळी भागाला पाणी दिले याचबरोबर तालुक्यात ४० वर्षात एकही दिवस विश्रांती न घेता सातत्याने काम करून हा तालुका उभा केला. कधी कुणाचे मन दुखावले नाही किंवा कुणाला त्रास दिला नाही चांगले वातावरण, चांगली संस्कृती ही आपली परंपरा राहीली. परंतु तालुक्याच्या विकासात कोणी आड येत असेल किंवा कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करत असेल तर स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा म्हणून लढणे माझे कर्तव्य आहे आणि मी ते केले. यापुढेही जनतेसाठी काम करणार आहोत. हे सांगताना चाळीस वर्षात तालुक्यात आणि राज्यात केलेल्या कामाचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला.
आपुलकी आणि तोच जिव्हाळा – यानंतर तालुक्यातून गावागावातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आमदार थोरात यांच्या भेटीसाठी व्यासपीठावर गर्दी केली स्वतः बाळासाहेब थोरात यांनी व्यासपीठावर थांबून प्रत्येकाला अत्यंत आपुलकीने आणि जिव्हाळ्याने भेट दिली. तालुक्यातील कोणालाही हा पराभव मान्य झाला नसून आजही तालुक्यातील जनतेचा यावर विश्वास बसत नाही. यामुळे अनेकांचे डोळे पाणवले तर अनेकांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. अत्यंत भावनिक वातावरणात झालेला स्नेह मेळावा आणि त्यानंतर तालुक्यातून प्रत्येक कुटुंबातून निर्माण झालेली मोठी हळहळ हे या संवाद मेळाव्यातून दिसून आले. हजारोंची उपस्थिती, आणि थोरात यांचे मनोगत यामुळे संपूर्ण वातावरण भावनिक झाले होते.