रविवार १५ डिसेंबर
नागपूर – सोमवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर मध्ये प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी नव्या मंत्र्यांची बैठक पार पडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नव्याने कॅबिनेट व राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले नवे मंत्री उपस्थित होते.
या बैठकीच्या प्रारंभी राज्याचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसा शोक प्रस्ताव मंत्रिपरिषदेने मंजूर केला.
शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना राज्य सरकार विरोधकांना देखील सोबत घेऊन काम करेन, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्र्यांच्या खाते वाटपाबाबत विचारले असता, दोनच दिवसांत खातेवाटप पूर्ण होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
विरोधकांचा सन्मान ठेवून कामकाज होईल – अजित पवार
चहापानावर अलीकडे विरोधी पक्ष सतत बहिष्कार घालतात त्यामुळे चहापान करावा की नाही करावं असा प्रश्न पडला आहे. विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं आहे. दोन-तीन दिवसात मुख्यमंत्री सर्वांचे खातेवाटप करतील आणि सरकार कामाला लागल्याचं दिसून येईल. विरोधक संख्येने कमी असले तरी महाराष्ट्राच्या हिताच्या प्रश्नावर सदस्यांना योग्य उत्तर दिले जातील. आम्हाला प्रचंड बहुमत आहे, म्हणून रेटून सभागृह चालवायचा असं कधीही होणार नाही, मुख्यमंत्र्यांनी आधीच ही भूमिका स्पष्ट केली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. तसेच, महाराष्ट्रातील परंपरा आहे, विरोधकांचा सन्मान ठेवून कामकाज चालवलं जाते. आम्ही विरोधकांकडे ते संख्येने कमी आहे म्हणून दुर्लक्ष करणार नाही याची ग्वाही देतो, असेही पवार यांनी म्हटले.