संगमनेर – शहरातील दिल्ली नाका येथे झालेल्या हाणामारी प्रकरणी अखेर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. अखेरीस गुन्हा दाखल झाल्याने आता या गुन्ह्याच्या तपासाकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.
रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जखमी विकास दीपक गायकवाड (रा. निळवंडे, संगमनेर) याच्या जबाबावरून भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११९(१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३५२, ३५१(१) नुसार लकी पान स्टॉल दुकानातील इसम व अनोळखी १५ ते २० जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, फिर्यादी त्यांच्या दोन मित्रांसोबत पान खाण्यासाठी लकी पान स्टॉल येथे थांबले होते. दुकानात जाऊन फिर्यादीने दुकानदारास साधा पान देण्यास सांगितले, परंतु त्याने ऐकले नाही म्हणून फिर्यादीने पुन्हा त्याला एक साधा पान द्या, असे सांगितले असता तो म्हणाला की, आवाज नीचे करके बात करने का और आखे नीचे करके बात कर, हमे पता है तुम्हारा आमदार आया है, पर उसका हम पर कुछ फरक नही पडेगा असे म्हणून तो दुकानाच्या बाहेर आला यावेळी त्याच्या हातात एक तलवार होती.
त्याने ती फिर्यादीच्या डोक्यात मारली यावेळी फिर्यादीच्या डोक्यात दुकानदाराच्या हातातील तलवारीची मूठ लागली त्यामुळे फिर्यादी खाली पडला. त्याच वेळी तर पंधरा ते वीस अनोळखी लोक आले व त्यांनी फिर्यादी आणि त्याचा मित्र निखिल बिडवे आणि विकास आहेर अशा तिघांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्याचवेळी दुकानदाराने आवाज दिला की इसमे से दो लोगो को काटे डालेंगे इसका सबका असर पडेगा असे म्हणून आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना पुन्हा लाथा बुक्क्यांनी मारहाण करून आरोपीपैकी कोणीतरी फिर्यादीच्या उजव्या हातातील सोन्याचे अंगठी खिशातील रोख आठ हजार रुपये काढून घेतले.
तसेच फिर्यादीचा मित्र निखिल बिडवे याला देखील मारहाण करून त्याच्या उजव्या हातातील एक सोन्याची व एक चांदीची अंगठी काढून घेऊन घेतली. दुसरा मित्र विकास बबन आहेर याच्या हातातील सोन्याची अंगठी व नऊ हजार रुपयांची रोख रक्कम खिशातून काढून घेतली. मारहाणीमध्ये फिर्यादीच्या डोक्याला हाताला छातीला व पाठीला दुखापत झाली आहे निखिल बिडवे यांच्या डोक्याला हाताला पायाला पाठीला दुखापत झाली असून विकास आहेर याच्या हाताला पायाला पाठीला मुका मार लागलेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान या घटने संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यात नेमकी घटना चित्रित झाली आहे. त्यामुळे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पवार आता काय तपास करतात याकडे लक्ष लागले आहे.