सोमवार, ०६ जानेवारी
संगमनेर – नाशिक-पुणे मार्गावर बस स्थानकानजीक दारूच्या नशेत तर्र झालेल्या मद्यपी तरुणाने सोमवारी संध्याकाळच्या सुमारास विश्रामगृहासमोर चार मुलींची छेडछाड केली. त्यामुळे नागरिकांनी या मद्यपी तरुणाला पकडत चांगलाच चोप देत त्याला पोलिसांच्या हवाली केले.
मद्यपी तरुणाने मुलींची छेडछाड केल्याने येथे काही वेळ नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. सोमवारी संध्याकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
नाशिक पुणे मार्गावरून शासकीय विश्रामगृहापासून शहरातील चार मुली जात असताना या ठिकाणी असलेल्या व अकोले तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका मद्यपी तरुणाने या मुलींची छेड काढली. घाबरलेल्या मुलींनी आरडाओरडा केल्याने स्थानिक नागरिकांनी या मद्यपी तरुणाला पकडले.
छेड काढणाऱ्या या तरुणाची नागरिकांनी चांगलीच धुलाई केल्यानंतर या संदर्भात शहर पोलिसांना माहिती दिली. तसेच या मद्यपी तरुणाला पकडून ठेवले. दरम्यान गर्दीमुळे घटनास्थळी आलेल्या पोलिसांना आपले वाहन देखील पुढे नेणे अशक्य बनले होते. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी या तरुणाला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले.