शुक्रवार, १० जानेवारी
छत्रपती संभाजीनगर: जन्मदात्या आईवर बलात्कार करणाऱ्या आरोपी मुलास सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
ही घटना जालना जिल्ह्यातील पारेगाव येथे १ मे २०२३ रोजी रात्री घडली. आरोपी राहुल गौतम गोवकवाड (२७, रा. पारेगाव, ता. जि. जालना) याला न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
पीडिता व आरोपी हे नात्याने मायलेक असून, १ मे २०२३ रोजी रात्री ८ वाजता आरोपी व पीडिता हे जेवण करून घराबाहेर अंगणात झोपलेले होते. आरोपीने घरात जाऊन घरातील लाईट बंद करून अंधार केला. मोबाईलची बॅटरी लावून पीडितेस हाक मारली. त्याच्या पायाला काहीतरी चावले असे म्हणून घरात बोलवले. तेव्हा पीडिता ही धावत घरात गेली. त्याला काय झाले असे विचारले, आईने मुलाच्या मांडीला पायाला बघत असताना आरोपीने पीडितेस अंगावर ओढले.
पीडितेने तू काय करत आहे, अशी विचारणा करत असतांना आरोपी मुलाने तिचे तोंड दाबले व म्हणाला की आवाज केला तर बघ असे म्हणून आरोपीने १ मे २०२३ रोजीच्या रात्रीतून तीन ते चार वेळेस अत्याचार केला. पीडितेच्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलीस ठाण्यात घटनेची फिर्याद नोंदविली गेली होती.
या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडिता, वैद्यकीय अधिकारी व तपासीक अंमलदार पोलीस उपनिरीक्षक बी. यू. कदम यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांनी राहुल गौतम गायकवाड (रा. पारेगाव, ता. जि. जालना) याला जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्या वतीने अँड. बाबासाहेब व्ही. इंगळे यांनी काम पाहिले.