पुणे – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी पुणे सत्र न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. या खटल्यात राहुल गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर आल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
खटल्याच्या सुनावणीसाठी राहूल गांधींनी उपस्थित रहावे यासाठी त्यांना न्यायालयाकडून वारंवार समन्स बजावण्यात आले होते. अखेर आज राहूल गांधी या खटल्याच्या सुनावणीवेळी व्हिडीओ कॉन्फरीन्सींग द्वारे न्यायालयासमोर आले.
या खटल्याची पुढची सुनावणी १८ फेब्रुवारीला होणार आहे. दरम्यान, राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा वाद सातत्याने माध्यमांत चर्चिला जातो. राहुल गांधींनी माफीवीर असे म्हणत सावरकर यांचा अवमान केल्याचा आरोप करत भाजपने राहुल गांधींविरुद्ध आंदोलनही केले होते. तर, भारत जोडो यात्रेतही त्यांनी सावरकरांचे नाव घेतल्याने वाद निर्माण झाला होता.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राहुल गांधींना पुण्यातील शिवाजीनगर न्यायालायात १९ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. याप्रकरणी गांधी यांनी न्यायालयात येऊन त्यांची बाजू मांडावी, असे न्यायालयाने म्हटले होते. मात्र, राहुल गांधी अनुपस्थितीत राहिल्यामुळे कोर्टाने त्यांना समन्स बजावत पुन्हा न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी आज ऑनलाईन उपस्थिती दर्शवत आपली बाजू मांडली.
काय आहे प्रकरण…
राहूल गांधींनी इंग्लंडमधील एका कार्यक्रमादरम्यान सावरकारांवर टीका केली होती. सावरकरांचे पाच सहा मित्र एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण करत होते आणि ते पाहून सावरकरांना आनंद होत होता असं सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवल्याचा दावा राहूल गांधींनी केला होता. सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींच्या या वक्तव्याच्या विरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्याच अनुषंगाने राहुल गांधी आज न्यायालयात ऑनलाइन हजर झाले असता, न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, फिर्यादीच्या वकिलांकडून राहुल गांधी यांना अजामीनपात्र वॉरंट काढावे अशी मागणी करण्यात होती. कोर्टाचं समन्स मिळूनही ते कोर्टासमोर हजर झाले नाहीत, त्यामुळे राहुल गांधींना कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखवू नये, अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली होती. त्यानंतर, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत आज राहुल गांधींनी न्यायालयात उपस्थिती दर्शवत आपली भूमिका मांडली.