अहिल्यानगर – शेअर ट्रेडिंग व्यवसायामध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिकचा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत शिर्डी येथील सेवानिवृत्त व्यक्तीची ‘कांचन’ नावाच्या महिलेने सुमारे पन्नास लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.
या संदर्भात अहिल्यानगरच्या सायबर पोलीस ठाण्यात कांचन नावाच्या महिलेविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४१९, ४२० सह आयटी ॲक्ट कलम ६६(ड) नुसार गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. फिर्यादीमध्ये संबंधित कांचन नावाच्या महिलेचा व्हाट्सअप नंबर नमूद करण्यात आला आहे.
समाज माध्यमातील शेअर ट्रेडिंगच्या माहितीवरून संपर्कात आलेल्या अनोळखी महिलेने ही फसवणूक केली आहे. फिर्यादी महावितरण विभागातून सेवानिवृत्त झाले असून शिर्डीतील रहिवासी आहे.
फसवणुकीचा हा प्रकार १२ एप्रिल २०२४ ते १७ मे २०२४ या दरम्यान घडला आहे. फिर्यादीला आपल्याकडील पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावयाचे असल्याने ते या संदर्भातील माहिती समाज माध्यमातून घेत होते. या दरम्यान त्यांना कांचन नावाच्या महिलेने व्हाट्सअप वरून संपर्क केला होता.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देऊ शकते असे आमिष दाखवत संबंधित महिलेने फिर्यादीचा विश्वास संपादित केला. त्यामुळे फिर्यादीने संबंधित महिलेवर विश्वास ठेवून १२ एप्रिल २०२४ ते १७ मे २०२४ या दरम्यान फसवणूक करणाऱ्या महिलेने दिलेल्या बँक खात्यावर ५० लाख १ हजार ३७९ रुपये वेळोवेळी पाठविले.
मात्र बराच काळ झाला तरी फिर्यादीला नफा तर दूरच मात्र गुंतवणूक केलेली रक्कम देखील मिळू शकली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आल्याने फिर्यादीने अहिल्यानगरच्या सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध तक्रार दिली असून अधिक तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम करत आहे.
शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत कांचनने केली ५० लाखाची फसवणूक
अहिल्यानगरच्या सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध तक्रार दिली असून अधिक तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम करत आहे.